कृषिमंत्र्यांच्या मराठवाड्यात बळीराजा मरणपंथाला
#छत्रपती संभाजीनगर
मागच्या तीन महिन्यातील राज्यात शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यात मराठवाड्यातील परिस्थितीदेखील विदारक आहे. राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार याच भागाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांच्या भागात मागील तीन महिन्यांत तब्बल २१४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
बँकांनी कर्ज न दिल्याने महागड्या व्याजाने सावकारी कर्ज घ्यावे लागल्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. याचबरोबर खताला जीएसटी लावून सबसिडी कपात केली जात आहे. कापसाला भाव मिळत नाही, तर हरभरा खरेदी करण्याबाबत निर्णय होत नाही. सोयाबीनने फटका दिला आणि आसमानी संकट सातत्याने सुरू आहे. यामुळे शेतकरी प्रचंड निराश असून गेल्या ९० दिवसांत मराठवाडा विभागात २१४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. दररोज सरासरी किमान दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विभागात होत असल्याचे धक्कादायक वास्तव या निमित्ताने समोर आले आहे. मराठवाड्यातील ४० शेतकऱ्यांना गेल्या हंगामात बँकांनी कर्ज दिले नसल्याने शेतकऱ्यापुढे दुसरा पर्याय उरलेला नाही. यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
वृत्तसंस्था