शेतकऱ्याला जात विचारणे चुकीचेच : पवार
#नाशिक
राज्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांना खते घेण्यासाठी जात विचारण्यात येत असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार अतिशय गंभीर आणि चुकीचा आहे, अशी टीका राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी शुक्रवारी (दि. १०) केली.
सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांना खते घेण्यासाठी जात विचारण्यात येत असल्याचे समोर आले आहे. नाशिक दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी या विषयावर आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘‘यापूर्वी असे कधीही घडलेले नाही. हे अत्यंत चुकीचे आहे, शेतकऱ्यांना जात का विचारली जात आहे, याची माहिती आम्ही
घेत आहोत.’’
रासायनिक खत खरेदी करताना शेतकर्यांना पॉस मशिनवर आपली जात सांगावी लागत असल्याचा प्रकार सांगलीत घडला आहे. याचे तीव्र पडसाद विधानभवनात उमटले. ‘सरकार शेतकऱ्याला जात विचारत असतील तर असे का विचारत आहेत? हे सर्वांना कळायला हवे,’ असे पवार म्हणाले.
नाफेड कांदा खरेदीच करत नसल्याचा आरोप पवार यांनी केला. ‘‘नाफेडच्या माध्यमातून जी बाहेरच्या केंद्रावर खरेदी केली जात आहे, ती ९५० रुपयांच्या आसपास आहे, मात्र शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार नाफेड जर खरेदी करत असेल तर १२००-१३०० च्या घरात भाव कांद्याला मिळाला पाहिजे,’’ असे त्यांनी नमूद केले.
‘‘मध्य प्रदेश, गुजरात, आणि राजस्थान सरकारने कांदा उत्पादकांना दिलासा देणारे निर्णय घेतले आहेत. मात्र महाराष्ट्रात अद्यापही सरकारची चर्चा सुरू आहे. जिरायत शेतकऱ्यांना अधिक प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यात कांदा अत्यंत महत्त्वाचे पीक आहे. अनुदान द्या, अथवा खरेदी करा, पण शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्या,’’ असे आवाहनदेखील पवार यांनी राज्य सरकारला केले. वृत्तसंस्था