अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याची पुन्हा चर्चा
#नागपूर
माजी मुख्यमंत्री आणि काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे येत्या काळात भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे. त्यातच अनेक लहान-मोठे नेते भाजपमध्ये येणार आहेत. २०२४ पूर्वी महाराष्ट्रातील राजकीय चित्र बदललेले असेल, असा दावा करीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या चर्चेला खतपाणी घातले.
काही महिन्यांपूर्वी अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा जोरात सुरू होती. चव्हाण यांनी मात्र अशा चर्चा निराधार असल्याचे सांगत आपण काॅंग्रेसमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. यावर बावनकुळे
यांनी प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडीला टोला लगावला ‘‘ २०२४ पर्यंत आपल्याला महाराष्ट्राचं चित्र बदलेलं दिसेल. ठाकरे गटाचे काही लोक येत आहेत. येणारा
लहान नेता आहे की मोठा हा प्रश्न नाही. ठाकरे गटातील नेते रोज त्यांना सोडून चालले हे महत्त्वाचं आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये विरोधी पक्षांनी घेतलेल्या सभेत अशोक चव्हाण यांचा अपमान करण्यात आल्याचा दावा बावनकुळे यांनी केला. ‘‘अशोक चव्हाण यांच्या चेहऱ्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की, कालच्या सभेत त्यांना मोठी खुर्ची भेटली नाही. सभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा अपमान झाला. त्यांचे कार्यकर्ते सभेतून निघून गेले.
दरम्यान पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन होऊन दोन दिवस होत नाहीत, तोच पुण्यात भाजप शहराध्यक्ष मुळीक यांचे भावी खासदार म्हणून पोस्टर लावण्यात आले होते. यावरून विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. यावर देखील बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. ‘‘या पोटनिवडणुकीवर आता चर्चा होणं हे पटण्यासारखे नाही. उत्साहाच्या भरात कार्यकर्त्यांनी ते पोस्टर लावले, मात्र असा उत्साहीपणा योग्य नाही, त्यांना समज दिली आहे,’’ असे ते म्हणाले.
वृत्तसंस्था