अनिक्षा जयसिंघानी गायब?
# मुंबई
अमृता फडणवीस यांना कथित ब्लॅकमेल केल्याच्या प्रकरणातील आरोपी अनिक्षा जयसिंघानी ही जेलमधून सुटल्यानंतर उल्हासनगरच्या तिच्या घरी परतली नाही. चौकशी आणि माध्यमांचा ससेमिरा चुकवण्यासाठी ती अज्ञातस्थळी रवाना झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी बुकी अनिल जयसिंघानी याची मुलगी अनिक्षाला १६ मार्च रोजी मुंबई पोलिसांनी उल्हासनगरमधून अटक केली होती. अनिक्षाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तिला भायखळा कारागृहात पाठवण्यात आले होते. २७ मार्च रोजी जामीन मिळाल्यावर मात्र अनिक्षा गायब झाली आहे. ‘‘अनिक्षाचा ब्लॅकमेलिंग प्रकरणात थेट सहभाग नाही. तिचे अमृता फडणवीस यांच्यासोबतचे नाते नेहमीच चांगले राहिले होते. राजकीय कारणावरुन तिला या प्रकरणात ओढण्यात आलं आहे,’’ असा युक्तिवाद अनिक्षाच्या वकिलाने न्यायालयात केला होता. तो ग्राह्य धरत न्यायालयाने अनिक्षाला जामीन मंजूर केला.वृत्तसंस्था