चालत्या लोकलमध्ये दिव्यांगाला जाळण्याचा मुंबईत प्रयत्न
#मुंबई
चालू असलेल्या लोकलमध्ये एका दिव्यांग (मूकबधिर) व्यक्तीला जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील या घटनेत नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या द्रवाचा वापर दिव्यांगला जाळताना केल्याचे दिसते. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्याला केईएम रुग्णालयात दाखल केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण लोकलमध्ये शनिवारी रात्री ११ च्या सुमारास कळवा-मुंब्रा स्थानकादरम्यान ही घटना घडली. नशेसाठी वापरण्यात येणारे द्रव हातावर टाकून दिव्यांगाला पेटवून दिले. यामध्ये त्याचा हात पूर्णपणे भाजला आहे. त्याचे नाव प्रमोद वाडेकर असे आहे. यात ३५ वर्षीय वाडेकरचा डावा हात होरपळला आहे. विशेष बाब म्हणजे, हल्ला करणाराही दिव्यांग असून हल्ल्यानंतर मुंब्रा स्थानकात उतरून तो निघून गेल्याचे कळते.
प्रमोद हा मुंबईतील एका हॉटेलमध्ये काम करतो. कामावरून लोकलने दिवा येथील घरी परतत असताना मुंब्रा स्टेशनजवळ विकलांग डब्यामध्ये एका अज्ञाताने प्रमोदच्या अंगावर ज्वलनशील द्रव पदार्थ टाकला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती प्रमोद वाडेकरचा भाऊ प्रसाद वाडेकर याने दिली.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनवर एकजण लोखंडी खांबावर चढला होता. खांबावर चढल्यानंतर तो आत्महत्या करण्याची धमकी देत होता. तो जेव्हा लोखंडी खांबावर चढला, तेव्हा त्याला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी जमली होती. या घटनेचा व्हीडीओ देखील समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती मानसिक रुग्ण आहे. प्लॅटफॉर्म ९ वर हा हाय व्होल्टेज ड्रामा शनिवारी रात्री झाला.