‘गुन्हा दाखल झाल्यावरही अमृता अनिक्षाला भेटल्या’
#मुंबई
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेले केले जात असल्याचे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी डिझायनर अनिक्षा जयसिंघानी आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी यांना अटक केली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी गुन्हा दाखल झाल्यानंतरही अमृता फडणवीस या अनिक्षाला भेटल्याचा दावा जयसिंघानी यांच्या वकिलाने केला आहे. अनिक्षाला कोर्टाने जािमन मंजूर केला.
कोर्टात अनिल जयसिंघानी यांची बाजू विरेंद्र खन्ना मांडत आहेत. सुनावणीत त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी मांडल्या आहेत. खंडणी कोणत्या कारणाने मागितली याचा कुठेही उल्लेख नसल्याचे खन्ना म्हणाले आहेत. शिवाय ज्या फोनवरून दोघांमध्ये संभाषण झाल्याचे सांगण्यात येते, तो फोन दोन दिवस बंद होता, असेही त्यांनी निदर्शनास आणले. गुन्हा दाखल झाल्यानंतरही अमृता फडणवीस अनिक्षाला तीन वेळा एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटल्याचं खन्ना यांनी म्हटलं आहे.
अमृता फडणवीस यांनी अनिक्षा या डिझायनर विरोधात गुन्हा दाखल केला असून अमृता यांना १ कोटींची लाच देऊ केल्याचा आरोप आहे. या तक्रारीनंतर मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखला केला आहे.
यामध्ये धमकावणे, कट रचणे आणि लाच ऑफर करणे या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार अनिक्षा १६ महिन्यांहून अधिक काळ अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती. तिने फडणवीस यांच्या निवासस्थानी अनेक वेळा भेट दिली होती. एका गुन्ह्यात मदत करण्याची मागणी करत बुकींची माहिती देऊन तब्बल १ कोटी तुम्हाला देऊ अशी ऑफर अमृता फडणवीस यांना तिने आणि तिच्या वडिलांनी केली होती.
१८ आणि १९ फेब्रुवारीला अनिक्षाने तिच्या व्हीडीओ क्लिप, व्हॉईस नोट्स आणि अनेक मेसेज एका अज्ञात फोन नंबरवरून पाठवले होते.