अखेर शुभांगी पाटील देणार तांबेंना टक्कर

काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही वडिलांनी उमेदवारी दाखल केली नाही, तर मुलगा सत्यजित तांबे याने शिक्षक पदवीधर मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर दोन उमेदवारांनी माघार घेतली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांचा मोबाईल नॉट रिचेबल गेला. त्यामुळे त्याही माघार घेणार अशी चर्चा असताना सोमवारी शेवटच्या दिवशी त्यांनी माघार घेतली नाही. उलट पाठिंब्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटले असल्याचे सांगितले. आता या मतदारसंघासाठी तांबे आणि पाटील अशी थेट लढत होईल.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Editor User
  • Tue, 17 Jan 2023
  • 04:09 pm
सत्यजीत तांबे, शुंभांगी पाटील

सत्यजीत तांबे, शुंभांगी पाटील

राजकीय घडामोडींनंतर नाशिक शिक्षक-पदवीधर मतदारसंघातील चित्र स्पष्ट

# मुंबई 

 

काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही वडिलांनी उमेदवारी दाखल केली नाही, तर मुलगा सत्यजित तांबे याने शिक्षक पदवीधर मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर दोन उमेदवारांनी माघार घेतली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांचा मोबाईल नॉट रिचेबल गेला. त्यामुळे त्याही माघार घेणार अशी चर्चा असताना सोमवारी शेवटच्या दिवशी त्यांनी माघार घेतली नाही. उलट पाठिंब्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटले असल्याचे सांगितले. आता या मतदारसंघासाठी तांबे आणि पाटील अशी थेट लढत होईल.  

विधान भवन

राज्यात होऊ घातलेल्या शिक्षक-पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुकांमधील उमेदवारीचे चित्र सोमवारी (दि. १६) दुपारी तीनपर्यंत स्पष्ट झाले. मात्र त्यापूर्वी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. पडद्याआड डाव-प्रतिडाव टाकण्यात येत होते. त्यामुळे नाशिक पदवीधरमध्ये लढत कशी होणार याची उत्सुकता लागली होती. सोमवारी दुपारी तीनपर्यंत शुंभागी पाटील यांनी आपला अर्ज मागे घेतलाच नाही. मात्र भाजपचे समर्थक धनराज विसपुते आणि धनंजय जाधव यांनी माघार घेतल्यामुळे नाशिकमध्ये सत्यजित तांबे, शुभांगी पाटील आणि सुभाष जंगले अशी लढत होईल. तांबे यांनी भाजपला पाठिंबा मागितला आहे, तर महाविकास आघाडी पाटील यांना पाठिंबा देईल. त्यामुळे तांबे-पाटील अशीच लढत होण्याची दाट शक्यता आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार शुभांगी पाटील या सोमवारी सकाळपासून नॉट रिचेबल होत्या. दुपारी त्या विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाल्या. याबाबत त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या, मी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर मला ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि जयंत पाटील हे पक्षश्रेष्ठी मला पाठिंबा देतील. महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझं नाव जाहीर करतील. मी माघार घेतली नाही आणि घेणारही नाही.

नाशिक, नागपूर, अमरावती, कोकण, औरंगाबाद या शिक्षक-पदवीधर मतदारसंघासाठी येत्या ३० जानेवारी रोजी मतदान होणार आहे, तर मतमोजणी २ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे.

 

कोण आहेत शुभांगी पाटील...

शुभांगी पाटील या बीए. डीएड. एम.ए. बी.एड. आणि एलएलबी पदवीधारक आहेत. पाटील या धुळ्यातील भास्कराचार्य संस्थेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र स्टुडंट असोसिएशन ही संस्था त्यांनी स्थापन केली. धुळ्यातील एज्युकेशन सोसायटी आणि जळगावच्या गोपाल बहुउद्देशीय संस्थेच्या त्या अध्यक्षा आहेत.

 

नागपूर शिक्षक मतदारसंघ

नागपूर शिक्षक मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने गंगाधर नाकाडे यांना मैदानात उतरवले होते. मात्र त्यांनी अर्ज मागे घेतला. नागपूरमध्ये भाजपचे विद्यमान आमदार नागो गाणार आणि काँग्रेसच्या सुधाकर आडबोले यांच्यात थेट लढत होईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश इटकेलवार यांनी आपला अर्ज मागे घेतला नसल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई करत पक्षातून निलंबित केले आहे.

 

अमरावती पदवीधर मतदारसंघ

अमरावती पदवीधर मतदारसंघाची जागा काँग्रेसने मिळवली आहे. काँग्रेसकडून धीरज लिंगाडे आणि भाजपचे विद्यमान आमदार रणजित पाटील यांच्यात लढत होईल.

 

कोकण शिक्षक मतदारसंघ

कोकण शिक्षक मतदारसंघातून शेकापचे नेते, विद्यमान आमदार बाळाराम पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणुकीत उतरले आहेत.

 

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रम काळे यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे. भाजपने काँग्रेसमधून आयात केलेले किरण पाटील यांना उमेदवारी दिली आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest