संग्रहित छायाचित्र
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अचानक खराब झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जरांगे पाटील यांना थ्रोट इन्फेक्शन झाले असल्याची माहिती समोर आली असून डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी ४ जूननंतर आंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. तसेच ८ जूनला त्यांची बीड जिल्ह्यात एक महासभा होणार होती. परंतु ही सभा रद्द करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांची तब्येत बिघडल्याने ते पुढे कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
जरांगे पाटील 'सगेसोयरे'ची मागणी पुन्हा एकदा करत असून त्यांनी त्यासाठी ४ जूनपासून उपोषणाचा इशारा दिला आहे. मात्र त्याआधीच त्यांची प्रकृती खालावली असून डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच त्यांच्या इतरही काही तपासण्या झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
८ जून ला मनोज जरांगे पाटील यांची बीड जिल्ह्यातील नारायणगड येथे सभा होणार होती. मात्र बीड जिल्हयावर दुष्काळाचे सावट आहे, तसेच पिण्याच्या पाण्याची कमतरता आणि उन्हाची तीव्रता या कारणांमुळे ही सभा रद्द करण्यात आली.