मीच उतरवला उद्धव ठाकरेंच्या मानेवरचा पट्टा

अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यावर सगळे सुचते. आमच्या जोरावर पदे उपभोगताना हे काही सुचले नाही. त्यांचा आजार मीच घालवला. त्यांच्या मानेवरचा पट्टा मी घालवला याचे श्रेय मला द्यायला हवे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Amol Warankar
  • Wed, 15 May 2024
  • 04:20 pm
Eknath Shinde

संग्रहित छायाचित्र

आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून माझे राजकारण संपवण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका

मुंबई : अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यावर सगळे सुचते. आमच्या जोरावर पदे उपभोगताना हे काही सुचले नाही. त्यांचा आजार मीच घालवला. त्यांच्या मानेवरचा पट्टा मी घालवला याचे श्रेय मला द्यायला हवे. उलट आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना समोर करून माझे राजकारण संपवण्याचे प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांनी केला आहे.  

शिवसेना पक्ष फुटल्यापासून दोन्ही गट सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. तसेच आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा दावा करत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले की, आमचा पक्ष हीच खरी शिवसेना आहे, कारण आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी चालत आहोत. 

आम्ही बाळासाहेबांचा विचार सोडलेला नाही. मात्र उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाने बाळासाहेबांच्या विचारांना डावलून औरंगजेबाचे विचार जवळ केले आहेत. बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसचा नेहमी विरोध केला, उद्धव ठाकरे हे त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. एकनाथ शिंदे यांनी नुकतीच एक मुलाखत दिली, त्यात त्यांनी शिवसेना पक्ष, सध्या चालू असलेल्या लोकसभा निवडणुकीवर भाष्य केले. तसेच विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.  

खऱ्या-खोट्या शिवसेनेबद्दल बोलायचे झाल्यास मी एवढेच सांगेन की, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेत आहोत. आम्ही बाळासाहेबांनी दाखवलेल्या मार्गाने चाललेलो आहोत. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे हे ज्या गोष्टी बाळासाहेबांना मान्य नव्हत्या, नेमक्या त्याच गोष्टी करत आहेत. त्यांना सावरकर नको तर औरंगजेब हवा आहे. त्यांची विचारधारा बदलली आहे. लोक मतदान करताना या गोष्टीचा नक्कीच विचार करतील. आम्ही विचारधारेसह विकासासाठी काम करत आहोत. आम्ही त्यांच्यासारखे निष्क्रिय नाही. आम्ही केवळ खुर्चीवर बसून फेसबुक लाईव्ह करत नाही. घरात बसून राज्य चालवता येत नाही. त्यासाठी तुम्हाला मैदानात उतरावे लागते. 

मुळात लोक कोणाला मत देतील? त्यांची कामे करणाऱ्याला की घरी बसणाऱ्याला? त्यांनी (उद्धव ठाकरे) केवळ कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, उद्धव ठाकरे मोठ्या प्रमाणात राजकीय प्रचारसभा घेत आहेत. 

प्रचारफेऱ्यांमध्ये सहभागी होत आहेत यावर एकनाथ शिंदे म्हणाले, या सगळ्याला केवळ डॉ. एकनाथ शिंदे जबाबदार आहेत. त्यांच्या (उद्धव ठाकरे) मानेवरचा पट्टा मी उतरवला आहे, याचे श्रेय मला द्यायला हवे.

शिवसेना आणि जनतेच्या भल्यासाठी

मी स्वतःच्या फायद्यासाठी हे सगळं केलं नाही. केवळ महाराष्ट्राच्या विकासासाठी हे पाऊल उचललं. तुम्ही अजित पवारांचे उदाहरण घ्या. ते अलीकडेच म्हणाले, मी शरद पवारांचा पुत्र असतो तर शरद पवारांनी असे केले असते का? अजित पवार हे हुशार आहेत, त्यांच्याकडे मोठा राजकीय अनुभव आहे. पक्ष चालवण्याची त्यांची क्षमता आहे. तरीही त्यांच्यावर पक्षात अन्याय झाला. आमच्या पक्षात तशी स्थिती नव्हती. तसेच मलादेखील कुठलीही राजकीय महत्त्वकांक्षा नव्हती. परंतु, आदित्य ठाकरेंना पुढे करून तुम्ही (उद्धव ठाकरे) माझी राजकीय कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न केलात, हेदेखील चुकीचे आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest