'माझी आई माझ्यासोबत'; अजित पवार म्हणाले...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे पवार कुटुंबापासूनही दुरावले असल्याचं बोललं गेलं. याबाबत आज मतदान झाल्यावर अजित पवार यांना विचारल्यावर ते म्हणाले, माझ्या घरात सर्वात ज्येष्ठ माझी आई आशाताई पवार या असून 'माझी आई माझ्यासोबत आहे'. असं म्हणतं त्यांनी विरोधक तसेच कुटुंबीयांना उत्तर दिलं. बारामती लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (७ मे) मतदान पार पडले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली आई आशाताई पवार यांच्यासमवेत काटेवाडीमधून मतदान केले. यावेळी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार उपस्थित होते.
बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही पवार कुटुंबासाठी अतिशय प्रतिष्ठेची बनली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीबरोबरच पवार कुटुंबातही फूट पडल्याचे दिसून आले. सुमारे शंभर सदस्य असलेल्या पवार कुटुंबातील बहुसंख्य सदस्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणं पसंत केलं. यात अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार हे देखील अजित पवारांच्या विरोधात जावून सुप्रिया सुळे यांचा प्रचार करताना दिसले. त्यामुळे अजित पवारांचे कुटुंब हे उर्वरित पवार कुटुंबापासून दुरावल्याचं बोललं जात होतं. यावर उत्तर देताना अजित पवार यांनी माझ्या सोबत माझी आई असल्याचं सूचक विधान केलं.
तुम्हाला एवढ्या मिरच्या का झोंबल्या?
अजित पवार यांनी आपल्या आई आशाताई पवार यांच्यासोबत जावून मतदान केलं. तसेच माझी आई माझ्यासोबत आहे असं सूचक विधान करून पवार कुटुंबीय आणि विरोधकांना उत्तर दिलं. त्यानंतर अजित पवारांचे बंधु श्रीनिवास पवार आणि आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर टिका केली. यावर प्रत्युत्तर देताना ‘मी फक्त आईला मतदानाला बरोबर आणले तर तुम्हाला एवढ्या मिरच्या झोंबल्या’ असा हल्लाबोल अजित पवार यांनी केला.
अजित पवार म्हणाले, माझी आई काल, आज आणि उद्याही माझ्यासोबत असेल. वडिलांच्या निधनानंतर मी जो आईला आधार दिला तो इतर कुणीही दिला नाही. याबाबत जवळच्या कोणालाही विचारले तरी कुणीही सांगेल. मी माझ्या आईला मतदानाला घेऊन गेलो ते एवढं यांच्या नाकाला झोंबलं. घरातील वयस्कर व्यक्तीला आपण आधार देतोच. समोरचे लोकही शरद पवारांना आधार देऊनच पुढे घेऊन जातात ना, असा प्रतिहल्ला त्यांनी यावेळी केला.
अजित पवार पुढे म्हणाले, पवार कुटुंबातील काही लोक कोणत्या पातळीवर चाललेत? समोरच्यांकडून संपूर्ण कुटुंब आमच्यासोबत असल्याचे दाखवण्यात येत आहे. जय आईने मला जन्म दिला त्या आईला मी फक्त मतदानासाठी घेऊन गेलो, तर तुम्हाला एवढ्या मिरच्या झोंबतात. निवडणुकीच्या काळात तुम्ही केलेले उद्योग जनतेने बघितले नाही का? असा सवाल त्यांनी यावेळी केला.