MPSC NEWS: ...अन्यथा 'भीक मागो' आंदोलन करणार, विद्यार्थ्यांचा एमपीएससीला इशारा

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. त्यानंतर आता एमपीएससीने पोलीस निरीक्षक (पीएसआय) या पदाच्या मैदानी चाचणीची तारीख जाहीर करावी अन्यथा विद्यार्थ्यांनी भीक मागो आंदोलनाचा इशारा दिला आहे.

MPSC Exam

संग्रहित छायाचित्र

राज्यसेवेची तारीख दिली आता पीएमआय मैदानी चाचणीची तारीख जाहीर करा

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. त्यानंतर आता एमपीएससीने पोलीस निरीक्षक (पीएसआय) या पदाच्या मैदानी चाचणीची तारीख जाहीर करावी अन्यथा  विद्यार्थ्यांनी भीक मागो आंदोलनाचा इशारा दिला आहे.

एमपीएससीकडून (MPSC) पीएसआय पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पीएसआय पदाची पूर्व परीक्षा ८ ऑक्टोबर २०२२ रोजी घेण्यात आली. तब्बल एक वर्षाने मुख्य मुख्य परीक्षा १ ऑक्टोबर २०२३ रोजी घेण्यात आली. मुख्यपरीक्षेचा निकाल लागल्यानंतर गेल्या पाच महिन्यांपासून शारीरिक चाचणीसाठी विद्यार्थी वाट पाहत आहेत. मात्र एमपीएससीच्या उदासीन कारभारामुळे मैदानी चाचणीला मुहूर्त लागला नाही. लोकसभा निवडणुकीमुळे प्रशासनावर ताण असतो. याचा विचार करुन एमपीएससीने मैदानी चाचणीच्या तारखा जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र कोणतेही नियोजन न करता तारीख जाहीर केली. त्यानंतर पु्न्हा १५ एप्रिल ते २ मे, २०२४ या कालावधीत मैदानी चाचणी आयोजित करण्यात आली. मात्र राज्यात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त व कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याकरिता मनुष्यबळ आवश्यक असल्याने शारीरिक चाचणीच्या कार्यक्रमाकरिता पोलीस अधिकारी तसेच इतर मनुष्यबळ पुरविणे शक्य होणार नसल्याचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांनी कळविले आहे. हे विचारात घेता शारीरिक चाचणीचा दिनांक १५ एप्रिल ते २ मे, २०२४ या कालावधीतील नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत असून, शारीरिक चाचणीचा सुधारित सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. असे एमपीएससीने जाहीर केलेल्या घोषणा पत्रकात प्रसिध्द केले होते.

पीएसआयची (PSI) मैदानी चाचणी सहा महिन्यांपासून रखडली आहे. मैदानी चाचणीचा सराव करत असल्यामुळे आरोग्याच्या तक्रारी देखील जाणवू लागल्या आहेत. त्यासाठी खर्च करावा लागतो. तसेच  महिन्याला १५ ते २० हजार रुपये खर्च येत आहे. हा खर्च आता परवडत नाही. वय वाढत असून घरचे लग्नाच्या पाठीमागे लागले आहेत. तसेच खरच तु पीएसआयची परीक्षा पास झाला आहेस का, पुण्यात नेमका कशासाठी राहिला आहे, तुला आईबापाची काळजी नाही का अशा प्रश्नांचा भडीमार केला जात आहे, त्यामुळे मानसिक संतुलन बिघडू लागले आहे. याचा विचार करुन एमपीएससीने कोणाच्या दबावाला बळी न पडता तत्काळ तारीख जाहीर करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी सीविक मिररशी बोलताना केली.  

पोलीस महासंचालक कार्यालयाने ६ मे रोजीच मनुष्यबळ देण्याचे मान्य केले असल्याचा विद्यार्थ्यांचा दावा...

पुणे लोकसभा मतदार संघाचे मतदान १३ मे रोजी पार पडणार आहे. त्यामुळे एमपीएससीने पुण्यात मैदानी चाचणी पावसाळ्यापूर्वी घ्यावी, अशी मागणी केली होती. दरम्यान, एमपीएससीने राज्यसेवेची तारीख जाहीर केल्याने आता पीएसआयच्या मैदानी चाचणीसाठी पात्र ठरलेले उमेदवार आक्रमक झाले आहेत. एमपीएससीने पोलीसांकडून मिळणारे मनुष्यबळ नसल्यामुळे तारीख पुढे ढकलण्यात आल्याचे एमपीएससीने जाहीर केले होते. त्यावर विद्यार्थ्यांनी पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता. या कार्यालयाकडून ६ मे लाच मनुष्यबळाबाबतची मागणी मंजूर करण्यात आली असून तशी सूचना एमपीएससीने ७ मे रोजीच पाठविण्यात आली आहे. असे असले तरी सुध्दा एमपीएससीकडून पीएसआय मैदानी चाचणीची तारीख का जाहीर केली जात नाही, अशी विचारणा विद्यार्थ्यांनी एमपीएससीला दिलेल्या निवेदनात विचारला आहे. एमपीएससीकडून तारीख जाहीर होत नसल्याने एमपीएससी कोणाच्या दबावाखाली काम करत आहे का असा प्रश्नही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest