संग्रहित छायाचित्र
पुणे : महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी झालेल्या १ लाख ८४ हजार २२० वीजग्राहकांनी वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद केला असून केवळ 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडला आहे. त्यांची तब्बल २ कोटी २१ लाख रूपयांची वार्षिक बचत होत असून या योजनेत पुणे परिमंडलातील १ लाख २३ हजार वीजग्राहकांनी राज्यात सर्वाधिक संख्येने सहभाग घेतला आहे.
पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत राज्यात पुणे परिमंडलाने गो-ग्रीन योजनेत सर्वाधिक आघाडी घेतली आहे. पुणे परिमंडलातील १ लाख २३ हजार ४०३ वीजग्राहक या योजनेच्या माध्यमातून १ कोटी ४८ लाख ८ हजार ३६० रुपयांची वार्षिक बचत करीत आहे. तर बारामती परिमंडल अंतर्गत ३३ हजार ७३८ वीजग्राहक ४० लाख ४८ हजार ५६० रुपयांची बचत करीत आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील १२ हजार ९७७, सातारा जिल्ह्यातील १२ हजार १९० आणि बारामती मंडलमधील ८ हजार ५७१ ग्राहकांचा समावेश आहे. तर कोल्हापूर परिमंडलातील २७ हजार ७९ ग्राहक या योजनेतून ३२ लाख ४९ हजार ४८० रुपयांची बचत करीत आहे. यामध्ये कोल्हापूर-१६ हजार ६१५ आणि सांगली जिल्ह्यातील १० हजार ४६४ ग्राहकांचा समावेश आहे.
महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेनुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वार्षिक १२० रुपयांची वीजबिलांमध्ये बचत होत आहे. वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ते 'गो-ग्रीन'मधील ग्राहकांना 'ई-मेल'द्वारे पाठविण्यात येतो. सोबतच 'एसएमएस'द्वारे देखील वीजबिलाची माहिती देण्यात येते. त्यामुळे ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंटचा त्वरीत लाभ घेणे आणखी शक्य झाले आहे.
दिवसेंदिवस पर्यावरणात प्रतिकूल बदल होत आहेत. त्यामुळे पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे. वीजबिलाची सॉफ्ट कॉपी जतन करून ज्यावेळी आवश्यकता असेल तेव्हा वीजबिलाची कागदी प्रिंट काढता येते. त्यामुळे कागदी मासिक बिलाचा वापर बंद करून गो-ग्रीन योजनेत वीजग्राहकांनी सहभागी व्हावे असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे. 'गो-ग्रीन' योजनेत सहभागी झालेल्या वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील ११ महिन्यांचे वीजबिले मूळ स्वरुपात उपलब्ध आहेत. आवश्यकतेप्रमाणे वीजग्राहकांना ते कधीही डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे.