संग्रहित छायाचित्र
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) पोलीस उपनिरीक्षक पदाच्या (पीएसआय) शारीरिक चाचणीची तारीख अखेर जाहीर केली आहे. मैदानी चाचणी २४ मे ते ६ जून या कालावधीत घेण्यात येणार आहे. एमपीएससीने जाहीर केलेल्या तारखांमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. याबाबत 'सीविक मिरर'ने सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले आहे.
पीएसआयची (PSI) मैदानी चाचणी सहा महिन्यांपासून रखडली होती. अनेक विद्यार्थ्यांना मैदानी चाचणीच्या सरावामुळे आरोग्याच्या तक्रारी देखील जाणवू लागल्या होत्या. त्यामुळे होणारा खर्चही त्यांना परवडत नव्हता. तसेच खरंच तु पीएसआयची परीक्षा पास झाला आहेस का, पुण्यात नेमका कशासाठी राहिला आहे, तुला आईबापाची काळजी नाही का अशा प्रश्नांचा भडीमार केला जात होता, त्यामुळे मानसिक संतुलन बिघडू लागले होते. याचा विचार करून एमपीएससीने कोणाच्या दबावाला बळी न पडता तत्काळ तारीख जाहीर करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी 'सीविक मिरर'शी बोलताना केली होती. तसेच एमपीएससीने तत्काळ पोलीस निरीक्षक (पीएसआय) या पदाच्या मैदानी चाचणीची तारीख जाहीर करावी अन्यथा 'भीक मागो' आंदोलनाचा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला होता.
दरम्यान, एमपीएससीकडून (MPSC) पीएसआय पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पीएसआय पदाची पूर्व परीक्षा ८ ऑक्टोबर २०२२ रोजी घेण्यात आली. तब्बल एक वर्षाने मुख्य परीक्षा १ ऑक्टोबर २०२३ रोजी घेण्यात आली. मुख्यपरीक्षेचा निकाल लागल्यानंतर गेल्या पाच महिन्यांपासून शारीरिक चाचणीसाठी विद्यार्थी वाट पाहत होते. मात्र एमपीएससीच्या उदासीन कारभारामुळे मैदानी चाचणीला मुहूर्त मिळत नव्हता. लोकसभा निवडणुकीमुळे प्रशासनावर ताण असतो. याचा विचार करुन एमपीएससीने मैदानी चाचणीच्या तारखा जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र कोणतेही नियोजन न करता तारीख जाहीर केली. त्यानंतर पु्न्हा १५ एप्रिल ते २ मे, २०२४ या कालावधीत मैदानी चाचणी आयोजित करण्यात आली होती. मात्र राज्यात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त व कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याकरिता मनुष्यबळ आवश्यक असल्याने शारीरिक चाचणीच्या कार्यक्रमाकरिता पोलीस अधिकारी तसेच इतर मनुष्यबळ पुरविणे शक्य होणार नसल्याचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांनी कळविले होते. हे विचारात घेता शारीरिक चाचणीचा दिनांक १५ एप्रिल ते २ मे, २०२४ या कालावधीतील नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत असून, शारीरिक चाचणीचा सुधारित सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल असे एमपीएससीने जाहीर केलेल्या घोषणा पत्रकात प्रसिध्द केले होते. त्यानंतर आज (दि. ९ मे) प्रसिद्ध केलेल्या घोषणा पत्रकात पोलीस महासंचालक कार्यालयाने सहमती दर्शवल्याने २४ मे ते ६ जून, २०२४ या कालावधीत पोलीस मुख्यालय, रोडपाली, सेक्टर १७, कळंबोली, नवी मुंबई येथे पीएसआयची (PSI) मैदानी चाचणी घेण्यात येणार असल्याचे एमपीएससीने जाहीर केले आहे.