अजित पवार राष्ट्रवादीत अस्वस्थ
#मुंबई
अजित पवार नाराज असून त्यांच्यासह राष्ट्रवादी काॅंग्रेसचे काही आमदार फुटणार असल्याच्या चर्चेनंतर राज्य सरकारमधील शिंदे गटाच्या एका नेत्यानेदेखील या संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. सध्या विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी असलेले राष्ट्रवादी काॅंग्रेसचे फायरब्रॅण्ड नेते अजित पवार हे आपल्या पक्षात अस्वस्थ अस्वस्थेत आहेत, असा दावा बंदरे आणि खनीकर्म मंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी करीत नव्या समीकरणांचे संकेत दिले.
काही दिवसांपूर्वी अजित पवार दुपारी अचानक नाॅट रिचेबल झाले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात काहीतरी शिजत असल्याच्या चर्चेला मोठ्या प्रमाणात खतपाणी मिळाले. मात्र, दुसऱ्याच दिवशी अजित पवार माध्यमांसमोर आले आणि त्यांनी ‘‘आजारपणामुळे विश्रांती घेत होतो. मी नाॅट रिचेबल झालो नव्हतो,’’ असे स्पष्ट करत या प्रकरणाची चर्चा बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर ईडीने महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतील हजारो कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रातून अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव वगळल्याचे समोर आले. त्यामुळे केवळ अजित पवारच नव्हे, तर राष्ट्रवादी आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या संभाव्य जवळीकीबाबत मोठी चर्चा रंगली. याचा धुरळा खाली बसत नाही तोच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी अजित पवार त्यांच्याच पक्षात अस्वस्थ असल्याचे शुक्रवारी (दि. १४) जाहीरपणे सांगितल्यावर अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे.
‘अजित पवार नाराज असून राष्ट्रवादीमधील काही आमदार त्यांच्याबरोबर फुटण्याची शक्यता आहे,’ या संदर्भात दादा भुसे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ‘‘अजित पवार अस्वस्थ आहेत, हे तर गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहात आहोत. सध्या घडत असलेल्या घटना पाहता काही पण होऊ शकते.’’ काही दिवसांपूर्वीही अजित पवार नॉट रिचेबल होते. याचाही संदर्भ त्यांच्या बोलण्यामागे होता.
अजित पवार हे राष्ट्रवादी काॅंग्रेससध्ये अस्वस्थ असल्याची चर्चा अनेकदा होत असते. २०१९ च्या लोकसभेत मुलगा पार्थ पवार याला राष्ट्रवादी काॅंग्रेसची उमेदवारी देण्यावरून उद्भवलेली परिस्थिती, पार्थ पवार यांचा पराभव, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस यांची सत्तास्थापनेची तयारी सुरू असताना अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना जाऊन मिळत पहाटे घेतलेली शपथ या घटनांवरून अजित पवार हे राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये अस्वस्थ असल्याचे संकेत मिळत होते.
वृत्तसंस्था