नागपुरात अजित पवारांचे भाषण नाही
#मुंबई
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणाशी संबंधित चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले अजित पवार नागपुरात होणाऱ्या महाविकास आघाडीच्या रविवारी (दि. १६) होणाऱ्या वज्रमूठ सभेत बोलणार नसल्याची चर्चा आहे.
नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसचे मुख्यालय आहे. त्यामुळे हे शहर म्हणजे आरएसएसचा बालेकिल्ला मानला जातो. या नागपूरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रॅण्ड नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाषण करणार नसल्याचे समजते. भाजपच्या जवळिकीमुळे ते या सभेत बोलणार नाहीत, अशी जोरदार चर्चा रंगली आहे. या सभेत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन नेते भाषण करणार आहेत. राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच विदर्भातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रमुख नेते असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख बोलणार असल्याने अजित पवार भाषण करणार नसल्याचे कारणही यासाठी देण्यात आले आहे.
नागपूरमध्ये होणाऱ्या वज्रमूठ सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच या सभेत प्रत्येक पक्षाचे दोन नेते बोलतील, हे आवर्जून सांगितले. या सभेला सुमारे एक लाख लोक जमतील, असा दावा त्यांनी केला. त्यामुळेच भाजपकडून या सभेला विरोध सुरू आहे. या सभेची त्यांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी हे प्रकरण कोर्टापर्यंत नेले असल्याचे ते म्हणाले. तसेच सभास्थळी प्रत्येक पक्षाचे दोन नेते बोलतील, ही माहितीही त्यांनी यावेळी दिली.
‘‘माझ्या माहितीप्रमाणे अजित पवार सभेला येणार आहेत. जयंत पाटील येत आहेत. इकडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भातले महत्त्वाचे प्रमुख नेते अनिल देशमुख आहेत. मला वाटते की जयंत पाटील आणि अनिल देशमुख यांचे भाषण होईल. मात्र, तो त्या पक्षाचा निर्णय आहे,’’ अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीतील महत्त्वाचे नेते आणि ठाकरे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार संजत राऊत यांनी व्यक्त केली.
...त्यापेक्षा शेतकऱ्यांचे, तरुणांचे प्रश्न महत्त्वाचे
महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेसचा समावेश आहे. या प्रत्येक पक्षातून प्रत्येकी दोन नेत्यांची भाषणे होतील. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील आणि अनिल देशमुख बोलणार असल्याचे समजते. त्यामुळे अजित पवार या सभेलाही उपस्थित राहणार नसल्याची चर्चा रंगली आहे. अजित पवार वज्रमूठ सभेत बोलणार नसल्याबद्दल विचारले असता काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सावध भूमिका घेतली. ते म्हणाले, ‘‘अजित पवार रविवारी सकाळी नऊच्या विमानाने निघणार आहेत. दहा-साडेदहा वाजता ते नागपुरात येतील, असे मला इथले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सांगत होते. तसा कार्यक्रमही त्यांनी पक्षाकडे पाठवला आहे. त्यामुळे सभेत अजित पवार बोलणार की नाही, या चर्चेपेक्षा शेतकऱ्यांचे, तरुणांचे, गरिबीचे, महागाईचे, देश सुरक्षित नाही या प्रश्नांना पेव फुटले आहे. याकडे थोडे लक्ष घालावे, असे मला वाटते.’’
वृत्तसंस्था