संग्रहित छायाचित्र
अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर असे करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली असल्याची माहिती राज्याचे महसूल आणि पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. अनेक दिवसांपासून ही मागणी प्रलंबित होती. राज्य सरकारने या संदर्भातील एक प्रस्ताव केंद्र सरकारला दिला होता. केंद्र सरकारने हा प्रस्ताव मान्य केला असून अहमदनगर जिल्हा अहिल्यानगर या नावाने ओळखला जाणार आहे.
अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करण्यात यावे ही मागणी गेले कित्येक वर्षांपासून करण्यात येत होती. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांची नावे बदलली गेली. त्यानंतर या मागणीने आणखीनच जोर धरला. शेवटी मागील वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंती दिनी जिल्ह्याचे नाव बदलण्याची घोषणा केली होती.
दरम्यान, राज्य सरकारने पाठवलेल्या प्रस्तावाला केंद्राने मंजूरी दिल्याने आता अहमदनगर जिल्हा अहिल्यानगर या नावाने ओळखला जाणार आहे.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे ट्विट:
अहील्यानगर नामांतराची वचनपूर्ती!!! नगर जिल्ह्याचे नामांतर अहील्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली.आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत जिल्ह्याचे नामकरण अहील्यानगर करण्यास मान्यता मिळाल्याने वचनपूर्ती झाल्याचा मनस्वी आनंद आहे. निर्णय होण्याकरीता सहकार्य करणारे विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही मनापासून आभार!