शेतकरी आत्महत्या हा काही आजचाच विषय नाही...
#छत्रपती संभाजीनगर
विवादास्पद वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणारे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा बेजबाबदार वक्तव्य केले आहे. ‘शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही. अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात,’ असे असंवेदनशील वक्तव्य त्यांनी केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे सतत त्यांच्या विधानाने चर्चेत असतात. त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत एक बेजबाबदार वक्तव्य केले आहे.
अवकाळी आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोयगावमधील नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी सत्तार म्हणाले, ‘‘शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही. अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात. शेतकऱ्यांना मदतीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मी माझ्या मतदारसंघात फिरून आलो. शेतीचे फार काही नुकसान झालेले नाही. काही प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यामुळे वस्तुनिष्ठ पंचनाम्यासाठी सोयगावला जाऊन आलो.’’ त्यांच्या या विधानावर विरोधकांनी टीका केली असून या मुद्द्यावरून विधिमंडळात गदारोळ होण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे, सत्तार यांनी हे विधान अनावधानाने केल्याची सारवासारव सत्ताधारी शिंदे गटाकडून करण्यात आली.
कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात आठवडाभरात सात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील चार शेतकरी हे सत्तार यांच्या मतदारसंघातील आहेत. सत्तारांच्या या वक्तव्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट आहे. सत्तार यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, सत्तार आणि राज्य सरकार हे असंवेदनशील आहे. शेतकऱ्यांबाबत कृषिमंत्र्यांची भाषा दिलासादायक नाही.’’वृत्तसंस्था