वोटबँक टिकावी म्हणून काही जणांकडून दंगल
सीविक मिरर ब्यूरो
छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी झालेली दंगल ही जाणीवपूर्वक घडून आणलेली दिसून येत आहे. काही जणांना त्यांची वोट बँक तयार करून ती टिकवायची आहे, याकरिता जाणीवपूर्वक हे घडवले गेले आहे, असा आरोप राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी केला.
गिरीश महाजन म्हणाले, ‘‘औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे झाल्यापासून अनेकांच्या पोटात गोळा आला आहे. खासदार संजय राऊत यांनी वारंवार नामांतरावरून आक्षेप घेत त्यांचा विरोध दर्शवला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर या नावाला त्यांचा विरोध आहे का, एकदा त्यांनी याचे स्पष्टीकरण द्यावे. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या दंगलीत मोठ्या प्रमाणात दगडफेक, जाळपोळ करण्याचे प्रकार घडले आहेत. काहीजणांना राजकारणच करायचे असून त्याप्रमाणे ते वागत आहेत. ’’ तपास यंत्रणांनी या अनुषंगाने चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
तपास यंत्रणांना नावे ठेवून चालणार नाही. शांत डोके ठेवून केलेला हा प्रकार दिसून येत आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सक्षम असून पोलीस यंत्रणा
यामागचे मुख्य सूत्रधार कोण याबाबत तपास करत आहेत. जे दोषी आहेत, त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल, असा इशारा महाजन यांनी दिला.
महाविकास आघाडीतर्फे छत्रपती संभाजीनगर येथे सभा घेण्यात येणार आहे. मात्र, आताच्या परिस्थितीत ही बाब त्यांना पटते का, हे त्यांनी तपासून पाहिले पाहिजे, अशी प्रतिक्रिया महाजन यांनी व्यक्त केली. सावरकर यात्रेबद्दल ते म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अपमान करून त्यांना अपमानित केले जात आहे. त्यांनी ब्रिटिशांकडे माफी मागितली म्हणणे चुकीचे आहे. सावरकरांची यात्रा संभाजीनगर या ठिकाणी करावयाची की नाही याबाबतचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील.’’
वृत्तसंस्था