जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बस दरीत कोसळली, ७ ते ८ जणांचा मृत्यू
#मुंबई
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे चार वाजण्याच्या सुमारास खासगी बस दरीत कोसळली आहे. या बसमध्ये ४० ते ४५ लोक होते. यामधील ७ ते ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर २८ लोक जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजी प्रभु वादक ग्रुपची गोरेगाव सुखकर्ता ट्रॅव्हल्स ही बस मुंबई येथील आहे. शुक्रवारी संध्याकाळी पुण्यातील कार्यक्रम संपवून रात्री ११ च्या सुमारास पुण्यावरुन गोरेगावच्या दिशेने निघाली होती.
यात बसमध्ये एकूण ४० ते ४५ लोक होती. गोरेगावला जाताना बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बस दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळाताच पोलिस आणि नागरिकांकडून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. यातील जखमींना खोपोली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बसमध्ये ५ ते ६ मुली आणि ४० मुले होती. यातील ११ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.