राज्यात लवकरच मोठा राजकीय भूकंप

येत्या १४ मार्च रोजी आमचे सरकार कोसळणार नाही. राज्यात मोठा राजकीय भूकंप होऊन उलट इतर पक्षांतील बडे नेते भाजपमध्ये येणार आहेत, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (दि. १०) केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sat, 11 Mar 2023
  • 07:34 am
राज्यात लवकरच मोठा राजकीय भूकंप

राज्यात लवकरच मोठा राजकीय भूकंप

इतर पक्षांतील मोठे नेते १४ मार्चला भाजपमध्ये येणार, बावनकुळेंचा दावा

#नागपूर

येत्या १४ मार्च रोजी आमचे सरकार कोसळणार नाही. राज्यात मोठा राजकीय भूकंप होऊन उलट इतर पक्षांतील बडे नेते भाजपमध्ये येणार आहेत, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (दि. १०) केला.

बावनकुळे म्हणाले, ‘‘हे सरकार म्हणजे बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात नाही. आमचे सरकार मजबूत असल्याने ते कोसळण्याचा प्रश्नच नाही. उलट विराेधकांमधील बडे नेते आमच्याकडे येणार आहेत. १४ मार्च रोजी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप येणार आहे.’’  बावनकुळे यांच्या विधानामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आता  कोणता पक्ष फुटणार, अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे.  

काही दिवसांपूर्वी विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा केला होता. ‘‘येत्या १४ मार्चला हे सरकार कोसळणार आहे. याची चाहूल लागल्यामुळे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पातून घोषणांचा पाऊस पाडला. आपण पुन्हा सत्तेत येणार नाही याची जाणीव झाल्यामुळे त्यांनी सर्वांना खूश करण्याचा प्रयत्न चालवला आहे,’’ अशी टीका विरोधकांनी अर्थसंकल्पावर बोलतानाही केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना बावनकुळे यांनी सरकार पडण्याची शक्यता स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली.

बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यापासून भाजपला अनेक निवडणुकांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे बावनकुळे यांनी आत्मचिंतन करावे, असा सल्ला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला होता. त्याला प्रत्युत्तर देताना बावनकुळेंनी त्यांच्या नेतृत्वात जिंकलेल्या निवडणुकांची आकडेवारी दिली.‘ ‘‘मी प्रदेशाध्यक्ष झाल्यावर ७,७३१ ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. त्यात भाजपचे ३,००३ सरपंच निवडून आले,’’ असे ते म्हणाले.

कसब्याच्या गेल्या चार निवडणुकीत आम्हाला जेवढी मते मिळाली होती. तेवढीच मते यावेळीही मिळाली आहेत. विजयासाठी चार टक्के मते कमी पडली आहेत. आम्ही आमची ताकद वाढवत आहोत. पुढील विधानसभा निवडणुकीत आम्ही हा मतदारसंघ पुन्हा परत मिळवू. २०२४ मध्ये स्वत: संजय राऊत हे आमचं अभिनंदन करतील, असा दावादेखील बावनकुळे यांनी केला.

शिंदे-फडणवीस सरकारने गेल्या सरकारपेक्षा दीडपट मदत शेतकऱ्यांना केली आहे. गेल्या सरकारमध्ये बोलाचा भात, बोलाची कढी होती. शेतकऱ्यांना तेव्हाची मदत अजूनही मिळाली नाही. अवकाळी पावसानंतर शिंदे–फडणवीस सरकारने तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. हे अधिवेशन संपण्यापूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळणार, असेही बावनकुळे यांनी सांगितले. वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest