ठाकरे-शिंदे गटामध्ये आरोप-प्रत्यारोपाचा धुरळा
#मुंबई
गेल्या वर्षी जूनमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी केलेल्या बंडाचे कवित्व अजून संपलेले नाही. या प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी एका कार्यक्रमात केलेल्या गौप्यस्फोटाची गुरुवारी राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा होती. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाने परस्परावर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. आदित्य ठाकरे म्हणाले की, ज्यांनी शिवसेना सोडली ते चाळीस लोक आपल्या आमदारकीसाठी आणि पक्षांतरामुळे मिळणाऱ्या पैशांसाठी भारतीय जनता पक्षाबरोबर गेले आहेत. अन्यथा पक्ष सोडण्याचे दुसरे कोणतेही कारण नव्हते. केंद्रीय तपास यंत्रणा आपल्याला अटक करतील या भीतीने सध्याचे मुख्यमंत्री मातोश्रीवर येऊन रडले होते. भाजपबरोबर चला, नाहीतर मला अटक होईल, असेही त्यांनी सांगितले होते.
आदित्य ठाकरे यांच्या आरोपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला फार महत्त्व दिले नाही. पत्रकारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, अरे ते जाऊ द्या रे आदित्यचा विषय. तो लहान आहे अजून. याआधीही आदित्य ठाकरेंनी जेव्हा मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली होती, तेव्हाही त्याला उत्तर देताना ते म्हणाले होते की, आदित्य ठाकरेंचा जन्म झाला नव्हता तेव्हापासून मी राजकारण करतो आहे. त्यामुळे ते काय बोलतात त्याला फार महत्त्व देऊ नका. आदित्य ठाकरे काहीही बोलले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्याला फारसं महत्त्व देत नाहीत.
आदित्य ठाकरे यांनी केलेल्या विधानावर शिंदे गटाच्या नेत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. तसेच एकनाथ शिंदे नाही तर उद्धव ठाकरेच रडले होते असं भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी म्हटलं आहे. “मी अजिबात उत्तर देणार नाही, कोण आदित्य ठाकरे? या शब्दात नारायण राणेंनी प्रतिक्रिया दिली.
शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांना लक्ष्य केलं आहे. केसरकर म्हणाले की, उद्धव ठाकरेंची एक मुलाखत तुम्ही बघा. त्यात ते म्हणाले की ‘मी एकनाथ शिंदेंना बोलावलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्ही मुख्यमंत्री व्हा, मी मुख्यमंत्रिपद सोडतो. त्यावेळी त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले होते’. हे स्वत: उद्धव ठाकरे म्हणाले होते. आदित्य ठाकरेंना खोटं कसं बोलावं याचं ट्रेनिंग द्यायचे काम चाललेले दिसते. त्यांनी त्यासाठी एक एजन्सी नेमलेली आहे. उद्धव ठाकरे जे बोलले, त्याच्या विरुद्ध आदित्य ठाकरे बोलत आहेत. खोटं कसं बोलायचं, याचं एक नवीन उदाहरण महाराष्ट्रात तयार होत आहे. एक नवीन गोबेल्स महाराष्ट्रात तयार होत आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही, असेही केसरकर म्हणाले.
आदित्य यांच्या दाव्याला दुजोरा देणाऱ्या संजय राऊतांनाही केसरकरांनी लक्ष्य केले. ते म्हणाले की, संजय राऊत कशालाही दुजोरा देतील. वाट्टेल ते बोलतात. तेही मुख्य प्रवक्ते आहेत आणि मीही. पण बोलण्याला एक मर्यादा असावी लागते. ती कोणीही सोडू नये. महाराष्ट्राच्या राजकारणाला कुठल्या स्तरावर न्यायचं यालाही मर्यादा आहे.
शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट म्हणाले की, आम्ही आमदारांनीच एकनाथ शिंदे यांना मातोश्रीवर जाण्यास सांगितलं होतं. आमचे म्हणणे मांडण्यासाठी ते तिथे गेले होते. कारण आम्ही सर्वच आमदार वारंवार उद्धव साहेबांना भेटायचो. आम्ही त्यांना सांगितलं होतं की, आम्हाला या आघाडीत राहायचं नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवाले आम्हाला त्रास देतात, सहकार्य करत नाहीत. निधीबाबत सहकार्य करत नाहीत. ही आमची भूमिका आम्ही उद्धवजींकडे मांडली होती.
शिरसाट म्हणाले की, आम्ही सर्व आमदार एकनाथ शिंदे यांच्याशी देखील बोललो. शिंदेंना म्हणालो, तुम्ही आमचे गटनेते आहात, आम्ही कोणाकडे जायचं. त्यानंतर निश्चितच एकनाथ शिंदे साहेब मातोश्रीवर गेले असतील. त्यानंतर शिंदे साहेबांनी देखील तेच सांगितलं. बाकी रडले वगैरे बोलायची ही त्यांची (आदित्य) स्टाईल असावी.
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही आदित्य यांच्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. त्या म्हणाल्या की, अनेकांच्या ईडी आणि सीबीआयकडे फाईल तयार होत्या. त्या उघडल्या जाण्याची भीती होतीच. त्यामुळे त्यांना सतत तसे वाटत होते. भाजपची ती मोडस ऑपरेंडीच आहे की आमच्यासोबत आलात तर आम्ही तुम्हाला वॉशिंग मशीनमधून धुवून काढू आणि दोषमुक्त करू, पण तुम्ही आमच्यासोबत आला नाहीत, तर मात्र तुम्ही जेलमध्ये जाल. एक तर भाजपमध्ये या नाहीतर जेलमध्ये जा ही भाजपची भूमिका कित्येक उदाहरणांवरून देऊन स्पष्ट करता येईल. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी मांडलेल्या भूमिकेत काही वेगळे नाही.