चाकूरकरांच्याच घरी केली चुलत भावाने आत्महत्या
#लातूर
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या लातूरमधील “देवघर” या निवासस्थानी त्यांच्या चुलत भावाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. हनमंतराव पाटील (वय ८५) असं त्यांचं नाव असून या घटनेने खळबळ उडाली आहे.
चंद्रशेखर ऊर्फ हनमंतराव पाटील हे शहरातील आदर्श कॉलनी भागात राहात होते. ते शिवराज पाटील चाकूरकरांचे चुलत भाऊ आहेत. ते दररोज सकाळी फिरायला बाहेर जात आणि परतल्यानंतर शिवराज पाटील यांच्या घरी चहा-पाणी घेत. त्यानंतर वर्तमानपत्र वाचल्यावर लगतच्या आपल्या घरी परत जात. हा त्यांचा नेहमीचा परिपाठ. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या कुटुंबातील बहुतेक लोक अभावानेच लातूरमधील निवासस्थानी असायचे. रविवारी (५ मार्च) शिवराज पाटील चाकूरकर यांचे चिरंजीव शैलेश पाटील हे सकाळी घरातच होते. नियमाप्रमाणे हनमंतराव पाटील चाकूरकर हे घरात आले. त्यानंतर शैलेश चाकूरकर यांनी त्यांना चहा घ्या मी आवरून येतो असं सांगून ते गेले. त्यानंतर काही वेळातच घरात गोळी झाडल्याचा आवाज झाला. घरातील नोकर आणि शैलेश पाटील धावत हॉलमध्ये आले, तेव्हा त्यांना हनमंतराव पाटील चाकूरकर हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.
हनमंतराव पाटील चाकूरकर हे वडिलोपार्जित शेती करायचे. त्यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. या सर्वांची लग्न झाली आहेत. ते सध्या एका मुलाबरोबर चाकूरकर यांच्या घराच्या बाजूला असलेल्या फ्लॅटमध्ये राहात होते. वयोमानाप्रमाणे त्यांना अनेक शारीरिक व्याधी होत्या. ते सततच्या आजारपणाला कंटाळल्याचंही सांगितलं जात आहे. घरात सून, मुलगा आणि नातवंडे असल्यामुळे त्यांनी फारसं कुणी नसणाऱ्या शिवराज चाकूरकरांच्या घरात आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. वृत्तसंंस्था