सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ
1) मी ४६ वर्षांची महिला आहे. माझी मुलगी आता पौंगडावस्थेत आहे. तिला लैंगिक शिक्षण देण्याचं योग्य वय कोणतं?
- पौगंडावस्था हेच योग्य वय असतं. त्यामुळे तुम्ही तिच्याशी आता मैत्रीण म्हणून बोलायला हवं आणि तिला काही गोष्टींची जाणीव करून द्यायला हवी. यासाठी तुम्ही पुस्तकांची मदत घेऊ शकता. एखादी माहितीपर चित्रफीत दाखवू शकता किंवा एखाद्या समुपदेशकाची मदतही घेऊ शकता. वय हा महत्त्वाचा मुद्दा नसतो, तर संबंधित मुलगा किंवा मुलगी किती समजूतदार आणि संवेदनशील आहे, याचा अंदाज घ्यायला हवा. पालक म्हणून तुम्हाला या गोष्टी कळू शकतात.
2) मी १८ वर्षांचा मुलगा आहे. लैंगिक शिक्षण मिळावे आणि कामजीवनाविषयी माहिती मिळावी, यासाठी मी त्या विषयाशी संबंधित काही पुस्तके वाचली. यावरून माझ्या आजूबाजूच्या लोकांनी माझी खूप टिंगल केली. मला चिडवलं. याचं मला खूप वाईट वाटलं.लैंगिक शिक्षण घेणं आणि त्याबद्दल जाणून घेणं, यात काहीही गैर नाही.
लैंगिक शिक्षण या उद्देशाने तयार करण्यात आलेली पुस्तके, व्हीडीओ तुम्ही आवर्जून बघा. मात्र, कोणतेही साहित्य बघताना त्याचा दर्जा पाहून घ्या. चुकीची माहिती देणारी पुस्तके किंवा अश्लील साहित्य याकडे चुकूनही वळू नका.
3) मी एक तरुणी आहे. मला आणि माझ्या जोडीदाराला चावट गप्पा मारायला खूप आवडतात. आम्ही बराच वेळ अशा विषयांवर बोलू शकतो. त्यातून आम्हाला आनंद मिळतो. मात्र, प्रत्यक्ष सेक्स करताना आम्ही तेवढे उत्साही नसतो, असं का होत असावं?
एकमेकांशी चावट गप्पा मारणं यात चुकीचं काही नाही. तो आनंदाचा, चेष्टेचा भाग आहे. त्यामुळे शरीरसंबंध अधिक दृढ होतात. एकमेकांमध्ये मोकळेपणा राहतो. मात्र, तुमच्यात कोणतीही क्रिया घडत नसेल किंवा तुम्हाला त्याबाबत निरिच्छा वाटत असेल, तर मात्र एखाद्या समुपदेशकाशी याबाबत चर्चा करा. त्याचा सल्ला घ्या.
4) सेक्सदरम्यान लिंगाला ताठरता येण्यासाठी आणि ती दीर्घ काळ टिकून राहण्यासाठी काही औषधोपचार घेणे योग्य ठरेल का?
तुम्हाला आणखी काही आजार आहे का किंवा तुमची मनस्थिती कशी आहे, यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे त्यांचा विचार आधी करा. स्वतःच्या मनाने कोणतेही औषधोपचार करू नका. डॉक्टरांशी बोलूनच योग्य तो निर्णय घ्या.
लैंगिक समस्यांबाबत आपल्या प्रश्नांसाठी- sexpert@punemirror.com
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.