सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ
लिंगाला फ्रॅक्चर होऊ शकतं का?
- 'पेनिल फ्रॅक्चर' असा एक प्रकार असतो. तो होऊ शकतो. लिंग ताठरलेल्या अवस्थेत असताना त्याच्यावर जोरदार आघात झाला किंवा ते जोरात वाकलं किंवा ताण पडला, तर इजा होऊ शकते. त्यावर शस्त्रक्रिया हाच पर्याय असतो. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मी २२ वर्षांची तरुणी आहे. माझं लग्न पुढच्या महिन्यात आहे आणि थोड्याच दिवसात आम्ही नवीन घरात जाणार आहोत. तिथे अद्याप कोणतंही फर्निचर करून घेतलेलं नाही. मला पाठदुखीचा त्रास आहे. त्यामुळे तिथे बेडशिवाय सर्व गोष्टी कशा जमतील, याबद्दल मला काळजी वाटते. मी काय करू?
- शरीरसंबंधांसाठी बेड असला तर उत्तमच. मात्र, नसेल तर त्याने फारसे अडत नाही. चांगल्या प्रतीची गादी देखील चालू शकते. पाठदुखीचा त्रास असल्यास डॉक्टर बऱ्याचदा जमिनीवर सतरंजी, चटई अंथरून त्यावर झोपण्याचा सल्ला देतात. त्यामुळे बेड पाहिजेच असा समज करून घेऊ नका. तरीही एकदा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यानुसार योग्य ते करा.
मी २८ वर्षांची स्त्री आहे. सेक्सनंतर काही काळ योनीमार्ग प्रसरण पावल्याचे मला जाणवते. सेक्सदरम्यान असं होणं स्वाभाविक आहे. मात्र, सेक्सनंतरही काही काळ तसंच वाटतं. सामान्यतः असं होतं का?
- सेक्सदरम्यान असं होणं स्वाभाविक आणि अपेक्षित आहे. मात्र, सेक्सनंतरही काही काळ असं होत असल्यास काळजी करण्याचं कारण नाही. बऱ्याचदा शरीरात झालेल्या बदलांमुळे योनीमार्ग पुन्हा आधीसारखा व्हायला वेळ लागू शकतो. त्यामुळे काळजी करू नये, परंतु तुम्हाला तिथे जळजळ होत असेल किंवा काही त्रास होत असेल, तर लगेच डॉक्टरांशी बोला आणि त्यांचा सल्ला घ्या.
माझे काका ६५ वर्षांचे आहेत. ते असं सांगतात की, ते रोज सेक्स करतात. त्याशिवाय ते राहूच शकत नाहीत. ६५ व्या वर्षी हे शक्य आहे का?
- हो, शक्य आहे. शारीरिकदृष्ट्या शक्य आहे. ते स्वतः जर तेवढे फिट असतील आणि त्यांच्या पत्नीची चांगली साथ त्यांना मिळत असेल, तर या गोष्टी शक्य आहेत. मात्र, ते म्हणतात की, रोज सेक्स होतो आणि त्या शिवाय जगू शकत नाही, ही थोडी अतिशयोक्ती वाटते. यामध्ये ते हायपरसेक्शुअल झाले आहेत का, याचीही तपासणी करा. त्यांच्यात मानसिकदृष्ट्या किंवा वागण्यात काही बदल झाले आहेत का, ते बघा. जर सर्व काही ठीक असेल, तर त्यांना त्यांच्या कामजीवनाचा आनंद घेऊ द्या.