सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ
सहा महिन्यांपूर्वी मी आई झाले. आमच्यात तेव्हापासून एकदाही सेक्स झालेला नाही. मात्र, मला त्याचे काहीच वाटत नाही. माझ्या बाळामुळे मी आनंदी आहे. अशी मनस्थिती सर्वांचीच असते का?
- बाळंतपणानंतर थोड्या फार प्रमाणात भावना बदलतात आणि सेक्सची इच्छा कमी होत जाते. मात्र, शरीरसंबंध अजिबात न ठेवणं हे योग्य नाही. याचा परिणाम तुमच्या मनावर आणि शरीरावरदेखील होऊ शकतो, तसेच तुमची आई म्हणून जशी काही कर्तव्ये आहेत, तशीच पत्नी म्हणूनही काही कर्तव्ये आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या पतीशी चर्चा करून यावर योग्य तो मार्ग काढा.
मी २५ वर्षांचा आहे. मला सर्व गोष्टी खूप पटापट करायला आवडतात. मला आता तशी सवयदेखील झाली आहे. त्यामुळे शरीरसंबंधांमध्येही मी असंच काही करेल का, अशी भीती मला वाटते. मी काय करू?
- इतर कामे पटापट करण्याच्या सवयीचा या गोष्टीवर फार परिणाम होईल, असं मला वाटत नाही. कारण या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. शरीरसंबंधांमध्ये जोडीदारासोबत तुम्ही किती सहजपणे सर्व गोष्टी करता यावर पुढचं सगळं अवलंबून असतं. त्यामुळे या गोष्टींमध्ये तुमच्या नेहमीच्या कामाचा वेग आणू नका, तरीही तुम्हाला असं काही होत असल्याचं जाणवल्यास समुपदेशकाशी चर्चा करा. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
तीन महिन्यांपूर्वी आम्हाला बाळ झाले. आता आम्ही दोघेही शरीरसंबंध ठेवण्यास उत्सुक आहोत. परंतु, माझ्या मनात शंका आहे. माझी पत्नी बाळाला स्तनपान देत आहे. त्यामुळे शरीरसंबंध ठेवणे योग्य ठरेल का?
- योग्य ती काळजी घेऊन तुम्ही शरीरसंबंध ठेवू शकता. स्तनपान देणाऱ्या महिलांमध्ये स्तनाग्रे उत्तेजित होण्याचे नकारात्मक परिणाम दिसून येत नाहीत. परंतु, ही क्रिया घडताना त्यांची प्रतिक्रिया आता निश्चितच वेगळी असू शकते. बाळाला दूध पाजल्याने स्तन अत्यंत संवेदनशील झालेले असतात. त्यामुळे कोणतीही क्रिया करताना तुम्ही सावध राहा.
मी २२ वर्षांचा आहे. माझ्या काकांनी मला सांगितले की, मानसिक थकवा किंवा आजारांवरचा रामबाण उपाय म्हणजे शरीरसंबंध आहे. कामक्रीडेमुळे मानसिक आजार बरे होतात. यात तथ्य आहे का?
- कामक्रीडेमुळे मन उत्साही होतं. तणाव दूर होतो. काही काळ आनंदात जातो, हे सगळं खरं असलं, तरीदेखील याचा प्रभाव थोडा वेळ असतो. त्यामुळे कामक्रीडेमुळे मानसिक आजार बरे होतात असे थेटपणे म्हणता येत नाही. मानसिक आजार असल्यास तुम्ही तत्काळ मानसोपचारतज्ज्ञांना दाखवा आणि समुपदेशकाचाही सल्ला घ्या.
लैंगिक समस्यांबाबत आपल्या प्रश्नांसाठी - sexpert@punemirror.com