सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ
मी ३३ वर्षांची आहे. माझ्या भावाच्या मित्राशी माझं चांगलं पटतं. आमची छान मैत्रीदेखील आहे. आम्ही अनेकदा बाहेर फिरायला वगैरे गेलो आहोत. मात्र, जेव्हाही मी त्याच्याशी बोलताना लग्नाचा विषय काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने तो टाळला आहे. आता तर तो माझ्याशी बोलणेच टाळतो. मी काय करू?
- मॅडम, तुम्हाला तुमच्या भावाच्या मित्राशी बोलताना तशा भावना वाटत असतील किंवा तुम्ही पुढचा विचार केला असेल. मात्र, त्याने तसा विचार कदाचित केलाच नसेल. तो तुमच्याकडे केवळ मैत्रीण म्हणूनच बघत असेल. त्यामुळे त्याला तुमच्या बोलण्यावर काय उत्तर द्यावं, हेच कळत नसेल. तुम्ही त्याला वेळ द्या. त्याच्याशी स्पष्टपणे बोला आणि त्याची इच्छा नसेल, तर मात्र जबरदस्ती करू नका.
मी २२ वर्षांची आहे. मला पुरुषी आवाज खूप आवडतो. एखाद्या पुरुषाचा आवाज खूप भारदस्त असेल, तर तो मला आवडू लागतो. अशी भावना होणं, हे चुकीचं आहे का?
- अजिबात नाही. यात काहीही चूक नाही. सौंदर्यस्थळे किंवा सौंदर्यदृष्टी वेगवेगळी असू शकते. स्त्रीला पुरुषाचा आवाज, त्याचा रांगडेपणा, काटक शरीर या गोष्टी आवडणं, हे खूपच नैसर्गिक आहे. मात्र, केवळ त्यावरच न भाळता तुम्ही त्याचा स्वभाव व अन्य गोष्टींचाही विचार करायला हवा.
मी ३० वर्षांचा आहे. मी आताच संपूर्ण शरीराची तपासणी केली. त्यात माझ्या शरीरात व्हिटॅमिन बी-१२ कमी आहे, असं मला जाणवलं. याचा माझ्या कामजीवनावर काही परिणाम होऊ शकतो का?
- व्हिटॅमिन बी-१२ हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्याच्या कमतरतेमुळे लिंगाला ताठरता येण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात किंवा शीघ्रपतनदेखील होऊ शकते. त्यामुळे त्या व्हिटॅमिनचे प्रमाण संतुलित राहील याकडे लक्ष द्या. आहारातदेखील तसे बदल करा. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. औषधोपचार करा.
शरीरसंबंधांनंतर मला योनीमार्गात खूप मोठ्या प्रमाणात जळजळ होते. इतर कोणताही त्रास होत नाही. मात्र, हा त्रास खूप होतो. मला जंतुसंसर्गदेखील झालेला नाही. मग असं का होत असावं?
- शरीरसंबंधांच्या आधी किंवा नंतर लगेच योनीमार्गात जळजळ होणं, याला वेदनादायी सेक्स असं म्हणतात. योनीमार्ग स्वच्छ नसणं, पाण्याची कमतरता, एखादी अॅलर्जी असणं किंवा योनीच्या आजूबाजूचे स्नायू खूप घट्ट असणं अशी काही प्रमुख कारणे यामागे असतात. तुम्ही डॉक्टरांना तुमची समस्या सांगा आणि 'एसटीआय'ची (सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स) चाचणी करून घ्या.
लैंगिक समस्यांबाबत आपल्या प्रश्नांसाठी - sexpert@punemirror.com