सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ
माझी पत्नी अधूनमधून 'पॉर्न व्हीडीओ' बघते, हे माझ्या लक्षात आले आहे. याचा आमच्या नात्यावर आणि शरीरसंबंधांवर काही परिणाम होईल का?
- सद्यस्थितीत तुमचं कामजीवन व्यवस्थित असेल, तर अजिबात अस्वस्थ होऊ नका किंवा खूप त्रागा करून घेऊ नका. पत्नी पॉर्न व्हीडीओ जास्त प्रमाणात पाहात असेल, तर तिच्याशी मोकळेपणाने चर्चा करा. तिला काय वाटतं याचा अंदाज घ्या. मात्र, एखाद्याच वेळी असं काही घडलं असेल, तर फार काळजी करण्याचं कारण नाही. तुम्ही सामंजस्याने हा प्रश्न सोडवू शकता.
मी २५ वर्षांचा आहे. नुकत्याच झालेल्या शरीरसंबंधांच्या वेळी माझ्या निरोधचा रंग बदलला. असे दरवेळी होत नाही. यामागे काय कारण असू शकेल?
- काही कंपन्या त्यांनी तयार केलेल्या निरोधमध्ये अँटिबॉडीज टाकतात. त्यामुळे निरोध एसटीडीसंबंधित (सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसिज) विषाणूच्या संपर्कात आल्यास ते रंग बदलतं. ही धोक्याची पूर्वसूचना असते. तुम्ही तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा आणि त्यांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्या.
मी ३० वर्षांचा आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मला पाठदुखीचा त्रास होतो आहे आणि त्यासाठी मी पेनकिलर घेतल्या आहेत. मात्र, दोन आठवड्यांपासून मला असे लक्षात आले आहे की, माझ्या लिंगाचा ताठरपणा कमी होत आहे. या दोन गोष्टी एकमेकांशी संबंधित असू शकतात का?
- तुम्ही किती प्रमाणात पेनकिलर घेतल्या आणि त्याचा डोस किती होता, यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. मात्र, या दोन गोष्टी एकमेकांशी संबंधित असू शकतात. त्यामुळे आवश्यकता वाटत नसल्यास आता पेनकिलर घेणे थांबवा आणि तत्काळ डॉक्टरांशी संपर्क सांधून त्यांना तुमची समस्या सांगा.
मी ३५ वर्षांचा असून, माझं 'सेक्स लाइफ' म्हणावं तेवढं चांगलं नाही. महिन्यातून दोन किंवा तीन वेळाच सेक्स होतो आणि तोही केवळ सुटीच्याच दिवशी. त्यामुळे उदासही वाटतं. मी काय करू?
- सर्वांत आधी, तर तुम्ही स्वतःला वेळ द्या. स्वतःशी आणि तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने संवाद साधा. केवळ सुटीच्याच दिवशी स्वतःला वेळ देत असाल, तरी ती सवय बदला. निराश होऊ नका. सेक्स किती वेळा होतो, याहीपेक्षा तो कसा होतो, याकडे लक्ष द्या. नैराश्यात अडकून राहू नका.
लैंगिक समस्यांबाबत आपल्या प्रश्नांसाठी - sexpert@punemirror.com