सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ
माझं लग्न ४ वर्षांपूर्वी झालं. मी आता ३० वर्षांची आहे. आमचं वैवाहिक जीवन अतिशय व्यवस्थित आहे. मात्र, शरीरसंबंधांवेळी नेहमी एकाच पद्धतीच्या पोझिशनमध्ये आम्ही असतो. याचा परिणाम कामजीवनावर होऊ शकतो का?
- विविध पोझिशन तुम्ही करून पाहिल्या, तर तुम्हालाच अधिक आनंद मिळेल. सेक्स ही गोष्ट तुम्हाला कंटाळवाणी होणार नाही. एकच एक क्रिया सतत करत राहिल्याने कालांतराने तुम्हाला त्याचा कंटाळा येऊ शकतो. अनेक दाम्पत्याला काही काळानंतर ती गोष्ट कराविशीच वाटत नाही, यामागे हेच कारण आहे. त्यामुळे तुम्ही नवनवीन क्रिया केल्यास तुमचे नातेसंबंधही दृढ होतील. तुम्ही अधिक आनंदी व्हाल.
मी २८ वर्षांची आहे. माझ्या अनेक मित्र-मैत्रिणाींना, घरच्यांना मी तापट वाटते. माझ्या नवऱ्याचेही हेच मत आहे. कामजीवनातही अनेक गोष्टी करताना तो मला भितो किंवा मोकळेपणाने क्रिया करत नाही, असं मला वाटतं. मी त्याला कसं समजावू?
- तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सगळ्यांनाच तुम्ही तापट वाटत असाल, तर तुम्हालाच कोणी तरी समजावण्याची गरज आहे. केवळ कामजीवन नाही, तर तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर संतापाचा परिणाम होऊ शकतो. यामुळे नात्यातील दरी वाढू शकते. संवाद थांबून कालांतराने कामजीवनात बाधा निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करा आणि नवऱ्याशी संवाद साधून त्याला विश्वासात घ्या.
मी ३८ वर्षांची आहे. माझ्याकडून भूतकाळातील प्रियकर आणि माझा नवरा यांची तुलना नकळतपणे केली जाते. मी काय करू? यामुळे माझा नवरा दुखावेल असं मला खूप वाटतं.
- कोणत्याही व्यक्तीला तिची दुसऱ्याशी तुलना केलेली आवडणार नाही. नवऱ्याला तर अजिबातच नाही. त्यातही त्याची पत्नी जर तिच्या भूतकाळातील प्रियकराचा विचार करत असेल, तर तो निश्चितच दुखावेल. त्यामुळे तुम्ही असं करू नका आणि मनातल्या मनातही तुम्ही अशी तुलना करू नका. यामुळे तुम्हालाच त्रास होईल. तुमचं चित्त कुठेच लागणार नाही. कशातूनच आनंद मिळणार नाही.
मी २६ वर्षांचा पुरुष आहे. मला असं वाटतं की, माझ्या शरीरात आणि मानसिक स्थितीतही असे काही बदल घडले आहेत की ज्यामुळे मला सेक्सचा आनंद घेता येत नाही. मी काय करू?
- तुमच्यात शारीरिक किंवा मानसिक काय बदल घडले आहेत, ते तुम्ही नमूद केलेलं नाही. त्यामुळे ते मला कळणार नाही. मात्र, नक्की कशामुळे तुम्हाला सेक्सचा आनंद घेता येत नाही, याचा विचार करा. ते कारण शोधा. गरज पडल्यास डॉक्टरांचा आणि समुपदेशकाचा सल्ला घ्या. तुमच्या मनातील गोष्टी समुपदेशकाशी मोकळेपणाने बोला. त्यातून मार्ग निघेल.
लैंगिक समस्यांबाबत आपल्या प्रश्नांसाठी - sexpert@punemirror.com