सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ
मी आता ४० वर्षांचा आहे. मध्यंतरी मी शरीर अधिक बळकट करण्यासाठी काही प्रोटिन्स आणि वेगवेगळ्या गोळ्या, पावडर घेत होतो. मात्र, नंतर याचा परिणाम माझ्या लैंगिक जाणिवांवार होतो आहे की काय, असे मला वाटले. लिंगाला ताठरता येण्यास अडचणी येऊ लागल्याचे मला जाणवत आहे. हे कशामुळे झाले असेल?
- डॉक्टरांचा सल्ला न घेता अशा प्रकारच्या गोळ्या किंवा पावडरचे सेवन केल्याने अशी समस्या निर्माण होऊ शकते. अशा प्रकारच्या अॅन्टिबायोटिक्सचा परिणाम तुमच्या कामेच्छेवर आणि कार्यक्षमतेवर होऊ शकतो. लिंगामध्ये ताठरता येण्यास अडचण होणं, हा त्याचाच भाग आहे. तुम्ही तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्ही घेत असलेले प्रोटिन्स, पावडर वगैरे घेणं बंद करा. काळजी करू नका. डॉक्टरांच्या औषधोपचाराने सर्व काही पूर्ववत होईल.
मी आता ३० वर्षांची आहे. मासिक पाळीच्या काळात माझ्या स्तनांचा आकार वाढतो आणि ते थोडे अधिक सुडौल वाटू लागतात. मात्र, त्या चार दिवसांनंतर त्यांच्यात पुन्हा शिथिलता येते. ते मला अजिबात आवडत नाही. ते सतत तसेच राहावेत, यासाठी काही करता येईल का?
- शरीरात होणाऱ्या अंतर्गत बदलांमुळे आणि हार्मोन्समुळे स्तनांचा आकार बदलतो. हा बदल मासिक पाळीच्या काळात विशेषत्वाने होतो. त्यामुळे तो बदल म्हणून घ्यायला हवा. स्तनांचा आकार मोठा करणं किंवा त्यांच्यातली शिथिलता जाऊन ते अधिक कठीण करणं, या गोष्टी शस्त्रक्रियेद्वारे, औषधांद्वारे करता येतात. मात्र, त्याचे काही दुष्परिणामही असू शकतात. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच योग्य ते करा. जे नैसर्गिकदृष्ट्या जसं आहे, ते तसंच राहू द्यावे, असा सल्ला मी तुम्हाला देईन.
मी ४० वर्षांचा पुरुष आहे. आजवर मी कोणतंही डेटिंग अॅप वापरलेलं नाही. नुकतंच मी एका महिलेशी अशाच एका अॅपद्वारे बोलणं सुरू केलं आहे. ते कितपत सुरक्षित आहे?
- या प्रश्नाचं उत्तर मी ठामपण देऊ शकत नाही. कारण मी काही त्या संबंधित महिलेस ओळखत नाही. मात्र, कोणतंही डेटिंग अॅप वापरताना खूप काळजी घ्यावी लागते. ती तुम्ही अवश्य घ्या, हे मी नक्कीच सांगेन. कोणत्याही महिलेशी प्रत्यक्ष भेटण्यासाठी तिची चौकशी करा. कोणालाही फसवू नका.
मी ३८ वर्षांची आहे. माझ्याकडून भूतकाळातील प्रियकर आणि माझा नवरा यांची तुलना नकळतपणे केली जाते. मी काय करू? यामुळे माझा नवरा दुखावेल असे मला खूप वाटते.
- कोणत्याही व्यक्तीला दुसऱ्याशी तुलना केलेली आवडणार नाही. नवऱ्याला तर अजिबातच नाही. त्यातही त्याची पत्नी जर तिच्या भूतकाळातील प्रियकराचा विचार करत असेल, तर तो निश्चितच दुखावेल. त्यामुळे तुम्ही असं करू नका आणि मनातल्या मनातही तुम्ही अशी तुलना करू नका. यामुळे तुम्हालाच त्रास होईल. तुमचं चित्त कुठेच लागणार नाही. कशातूनच आनंद मिळणार नाही.
लैंगिक समस्यांबाबत आपल्या प्रश्नांसाठी - sexpert@punemirror.com