सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ
गेल्या काही दिवसांपासून मला कोंड्याचा खूप त्रास होतो आहे. तसाच प्रकार मला माझ्या अंडाशयावरही दिसला. तेथील त्वचेचे पापुद्रे निघत आहेत. याचा आणि कोंडा होण्याचा काही संबंध असेल का?
- तुम्हाला एखादी अॅलर्जी किंवा त्वचारोग झाला असण्याची शक्यता आहे. तुम्ही तत्काळ त्वचारोगतज्ज्ञाला दाखवा. औषधोपचार सुरू करा. स्वच्छता ठेवा. ती जागा कोरडी ठेवा. अंतर्वस्त्रे स्वच्छ आणि धुतलेलेच वापरा.
माझा नवरा मद्यपान केल्याशिवाय शरीरसंबंध ठेवतच नाही. तो दर वेळी मद्यपान करूनच या गोष्टी करतो. मी काय करू?
- मला असं वाटतं, की त्याला नैराश्याने ग्रासलं आहे. मद्यपान केल्यावर उत्तेजित होऊनच आपण ही क्रिया करू शकतो, अशी त्याची धारणा झाली असल्याने, तो त्याच गोष्टीवर अवलंबून आहे. मात्र, ही सवय बदलता येऊ शकते. तुम्ही त्याच्याशी मोकळेपणाने संवाद साधा आणि ही गोष्ट तुम्हाला आवडत नसल्याचेही सांगा. तो समजूतदार असेल, तर तुमच्या म्हणण्याचा नक्कीच विचार करेल.
मी ४२ वर्षांची महिला आहे. मला संततीनियमनाच्या गोळ्या घ्यायची अजिबात इच्छा नाही. गर्भधारणा रोखण्यासाठी आणखी कोणते पर्याय उपलब्ध आहेत?
- संततीनियमनासाठी खूप महिला गोळ्या घेतात. अनेकांना तो सुरक्षित पर्याय वाटतो. मात्र, त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे वयाच्या कोणत्या टप्प्यापर्यंत त्या गोळ्या घ्याव्यात, याला मर्यादा आहे. शस्त्रक्रिया करून घेणं, हाही एक पर्याय आहे. त्याच बरोबर शरीरसंबंधांवेळी निरोध वापरणं हादेखील अत्यंत सोपा पर्याय आहे. याशिवाय तुम्ही डॉक्टरांशी चर्चा करून आणखी काही पर्यायांचा विचार करू शकता.
मी ५२ वर्षांची स्त्री आहे. माझा मेनोपॉज नुकताच आला आहे. आता आम्ही प्रोटेक्शन न वापरता सेक्स करणं सुरक्षित ठरेल का? मेनोपॉजनंतरही गर्भधारणा होऊ शकते का ?
- मेनोपॉजनंतर गर्भधारणा होण्याची शक्यता खूपच कमी असते. क्वचितच असं होतं. मात्र, यासाठी तुम्ही डॉक्टरांचा किंवा स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. कारण गर्भधारणा होतच नाही, असं ठामपणे म्हणता येत नाही. त्यामुळे तुम्ही कशावरही अवलंबून न राहता डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरेल.
लैंगिक समस्यांबाबत आपल्या प्रश्नांसाठी - sexpert@punemirror.com