Sexpert and Psychiatrist : सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ

डॉ रोहन जहागीरदार (मानसोपचार तज्ज्ञ आणि तज्ज्ञ)

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 20 Jul 2023
  • 11:44 pm

सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ

मी ४५ वर्षांचा आहे. मी तरुण असताना माझं कामजीवन खूप बहारदार होते. आता त्या तुलनेत अनेक गोष्टींमध्ये कमतरता जाणवते. माझ्या पत्नीचे मी समाधान करू शकेन की, नाही याबाबतही अविश्वास वाटतो. यावर काही उपाय आहे का?

- केवळ शरीरसंबंधांबाबतच नाही, तर अनेक गोष्टी तरुणापणात खूप छान प्रकारे होतात. वयपरत्वे अनेक गोष्टी बदलतात. शारीरिक आणि मानसिकस्थितीतही बदल होतो. हा बदल स्वीकारून स्वतःला अधिक 'फिट' ठेवण्यासाठी प्रयत्न करा. व्यायाम, आहारातील बदल यामुळे या गोष्टी साध्य होऊ शकतील. निराश होऊ नका. पत्नीशीदेखील मोकळेपणाने संवाद साधा. तिला विश्वासात घ्या. गरज पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचोर करा.

एखाद्या स्त्रीला शरीरसंबंधांमध्ये समाधान मिळाले नाही, तर काय होते?

- खरं तर, या प्रश्नावर निबंध लिहिता येईल. मात्र, याचे अनेक दुष्परिणाम जाणवतात. चिडचिड वाढणे, मानसिक संतुलन बिघडणे, सतत उदास राहणे, शरीरात काही बदल घडून येणे आणि महत्त्वाचं म्हणजे वैवाहिक जीवनावर परिणाम होणे, अशा अनेक गोष्टी दिसून येऊ शकतात. त्यामुळे स्त्रीला शरीरसंबंधांमध्ये तृप्तता किंवा समाधान मिळाले नाही, तर काय होते, यावर चर्चा करण्यापेक्षा, तसे होऊ नये यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

मी २७ वर्षांचा आहे. शरीरसंबंधांच्या वेळी मागील तीन वेळा असे झाले की, माझे वीर्यपतन झाले नाही, तसेच कधी कधी लिंगाला ताठरताही येत नाही. मात्र, मी हस्तमैथून करतो, तेव्हा मला असा त्रास जाणवत नाही. मी काय करू?

-  तुम्हाला हस्तमैथूनाच्या वेळी असा त्रास जाणवत नसेल, तर तुम्हाला शारीरिक अडचण नसून मानसिक काही तरी त्रास आहे, असं मला वाटतं. तुम्ही समुपदेशकाशी चर्चा करा. तुम्ही शरीरसंबंधांच्या वेळी दुसरा कोणता विचार करता का, याकडेही लक्ष द्या. तसं होत असल्यास त्या क्षणी स्वतःला संपूर्णतः त्याच बाबतीत एकाग्र करा. केवळ कृती करून शरीरसंबंधांचा आनंद किंवा समाधान मिळत नाही, तर त्यामध्ये तुमचं चित्तही असावं लागतं. तसं नसेल, तर गोष्टी नीट होणार नाहीत. त्यामुळे या गोष्टी ओळखून वेळीच डॉक्टरांना दाखवा.

मी ३० वर्षांची महिला आहे. फोरप्लेदरम्यान अनेकदा आमच्यात वाद होतात आणि नवरा मला खूप टोचून बोलतो. त्यामुळे मला वाईट वाटते. मात्र, भांडण होऊ नये, म्हणून मी गप्प राहते. त्याला हे कसं समजावून सांगू, ते मला कळत नाही.

-  ही गोष्ट लपवून ठेवण्यासारखी किंवा सहन करण्यासारखी नाही. तुम्ही तुमच्या नवऱ्याला स्पष्ट शब्दांत ही गोष्ट समजावून सांगायला हवी. सातत्याने असे होत राहिले आणि तुम्ही सहन करत गेलात, तर एका मर्यादेनंतर तुमची सहनशक्ती संपेल आणि त्याचा परिणाम खूप भयानक होऊ शकतो. याचा परिणाम तुमच्या कामजीवनावरही होऊ शकतो. त्यामुळे वेळीच सर्व गोष्टी स्पष्ट बोला आणि त्यांना धोक्याची पूर्वसूचनाही द्या.

 

लैंगिक समस्यांबाबत आपल्या प्रश्नांसाठी - sexpert@punemirror.com

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story