सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ
मी २० वर्षांचा आहे. हस्तमैथून करताना मी एका मुलीसोबत आहे, अशी कल्पना करत असतो. मात्र, मी निरोध घालूनच हस्तमैथून करतो. यात काही चूक आहे का?
- यात चूक किंवा बरोबर असे असू शकत नाही. हा प्रकार 'फॅन्टसी'वर अवलंबून आहे. यात कोणतीही हानी होत नाही. त्यामुळे तुम्ही करत आहात, ते चूक आहे, असं म्हणता येणार नाही.
व्यायामाचा कामजीवनावर कसा परिणाम होतो?
- निश्चितच चांगला परिणाम होतो. नियमित व्यायाम केल्यास तुमचं रक्ताभिसरण चांगलं होतं. स्नायूंची ताकद वाढते आणि अर्थातच तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे तुमच्या कामजीवनाचा आनंद घेऊ शकता. त्यामुळे त्रास होत नाही. थकवा येत नाही. स्टॅमिना वाढतो. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला अधिक आनंद मिळतो. याशिवाय नियमित व्यायाम करण्याचे अन्य काही फायदेदेखील आहेत. त्यामुळे नियमित व्यायाम करणं कधीही फायदेशीरच आहे.
मी २८ वर्षांची महिला आहे. गेल्या काही दिवसांपासून मला खूप निराश वाटत आहे. याचा परिणाम म्हणूनच की काय, मला शरीरसंबंधांमध्येही रस वाटत नाही. मी काय करू?
- तुम्हाला नैराश्य आलं आहे. नैराश्य आलं असल्याच्या काही लक्षणांपैकी हे एक लक्षण आहे की, ज्यात तुम्हाला कोणत्याच गोष्टीत रस वाटत नाही. याचा परिणाम म्हणूनच की काय, तुम्हाला आता शरीरसंबंधांमध्येही रस वाटत नाही. तुम्ही लवकरात लवकर समुपदेशक किंवा मनोविकारतज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि त्यांना तुमची समस्या सांगा. नैराश्य अधिक वाढू देऊ नका.
मी २० वर्षांची आहे. माझ्या एका मैत्रिणीने मला असे सांगितले की, हस्तमैथून केल्याने स्तनांचा आकार वाढतो. तिच्याबाबतीत तसे झाले आहे, असे तिचे म्हणणं आहे. असं होऊ शकतं का?
- तिला तिच्या स्तनांच्या आकाराबद्दल काही प्रश्न असतील, तर तिने डॉक्टरांकडून शंकानिरसन करून घ्यावे. हस्तमैथून आणि स्तनांचा आकार याचा काहीही संबंध नसतो. असं असतं तर, अनेक तरुणींनी स्तनांचा आकार वाढवण्यासाठी हाच पर्याय निवडला असता. कोणीही अन्य कोणतेही औषधोपचार घेतले नसते किंवा व्यायामदेखील केला नसता. त्यामुळे तुमच्या मैत्रिणीच्या म्हणण्यात कोणतेही तथ्य नाही.
लैंगिक समस्यांबाबत आपल्या प्रश्नांसाठी - sexpert@punemirror.com