सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ
1) मी ३२ वर्षांचा आहे. शरीरसंबंधांनंतर मला खूप राग येतो. माझी खूप चिडचिड होते. असं दर वेळी होतं. असं का होत असावं?
- शरीरसंबंधांवेळी असं काही घडतं का, की ज्यामुळे तुम्हाला राग येतो, याकडे लक्ष द्या. तुमच्या कल्पना आणि वास्तव खूप वेगळं आहे, म्हणून असं काही घडतं आहे का, याचा विचार करा. तसं घडत असल्यास तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोला. मात्र, तुम्हाला नैराश्य आलं असेल आणि त्यामुळे सतत चिडचिड होत असेल, तर डॉक्टरांशी मोकळेपणाने बोला आणि त्यातून वेळीच मार्ग काढा.
2) मी २२ वर्षांची तरुणी आहे. गेल्या वर्षी माझा विवाह झाला. आम्हाला लगेच संतती नको आहे म्हणून शरीरसंबंधांवेळी निरोधचा वापर केला जात आहे. हे कितपत योग्य आणि सुरक्षित आहे?
- संततीनियमनासाठी निरोधचा वापर करणे योग्य आहे, त्यात चूक काहीच नाही. निरोध बऱ्याच प्रमाणात सुरक्षितदेखील आहे. मात्र, तुम्ही योग्य ती काळजी घ्या. निरोधमुळे कोणताही त्रास झाल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
3) मी ४५ वर्षांचा आहे. शरीरसंबंधांवेळी शांत संगीत ऐकावे, असा सल्ला मला काही जणांनी दिला. तसे करणे योग्य ठरेल का?
- हा संपूर्णत: तुमचा निर्णय आहे. तुम्हाला त्या वेळी संगीत ऐकणं आवडत असेल, तर तुम्ही सुरू ठेवा. काही जणांना संगीताचा व्यत्यय वाटतो. मात्र, तुम्हाला त्यातून आनंद मिळत असेल, तर तुम्ही ते ऐकू शकता. याचा वाईट परिणाम तुमच्या शरीरसंबंधांवर होऊ देऊ नका. संगीत ऐकून तुम्हाला छान वाटत असेल, तर नक्की ऐका.
4) मी ५२ वर्षांची स्त्री आहे. माझं मेनोपॉज नुकताच आला आहे. आता आम्ही प्रोटेक्शन न वापरता सेक्स करणं सुरक्षित ठरेल का? मेनोपॉजनंतरही गर्भधारणा होऊ शकते का ?
- मेनोपॉजनंतर गर्भधारणा होण्याची शक्यता खूपच कमी असते. क्वचितच असं होतं. मात्र, यासाठी तुम्ही डॉक्टरांचा किंवा स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. कारण गर्भधारणा होतच नाही, असं ठामपणे म्हणता येत नाही. त्यामुळे तुम्ही कशावरही अवलंबून न राहता डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरेल.
5) मला डॉक्टरांनी माझ्या योनीभागावर एस्ट्रोजन क्रीम लावायला सांगितलं आहे. मात्र, ते लावल्यावर खूप दाह होईल, या भीतीने मी ते लावत नाही. योनीत ओलावा राहावा यासाठी मी आणखी काय वापरू शकते?
- तुम्ही बाजारात मिळणारे वेगवेगळे जेल वापरू शकता. मात्र, तुम्हाला डॉक्टरांनी एस्ट्रोजन लावायला सांगितलं आहे, याचा अर्थ तो 'एचआरटी'चा (हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी) भाग आहे. त्यामुळे तुम्ही डॉक्टरांनी जे सांगितलं आहे, तेच करा. तुम्ही पहिल्यांदा अतिशय थोडे क्रीम लावा आणि काय होतंय ते बघा, खूपच त्रास झाल्यास डॉक्टरांना दाखवा.
लैंगिक समस्यांबाबत आपल्या प्रश्नांसाठी - sexpert@punemirror.com