सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ
शरीरसंबंधांच्या वेळी माझ्या जोडीदाराने पुढाकार घ्यावा, असे मला वाटते. महिला असल्यामुळे या बाबतीत पुढाकार घेताना मला खूप लाजल्यासारखे होते. कितीही प्रयत्न केला तरी, लज्जेमुळे शरीरसंबंधांत पुढाकार घेणे मला शक्य होत नाही. कदाचित माझ्यावर परंपरागत विचारांचा पगडा असल्यामुळे असे होत असावे, पण अलीकडे मला याचा त्रास होत आहे. मी काय करू?
- याबाबतीत तुम्ही सर्वप्रथम तुमच्या जोडीदारासोबत मोकळेपणाने बोला. त्रास करून घेणे हा यावरील उपाय नक्कीच होऊ शकत नाही. शरीरसंबंधांच्या क्रियेत दोघांचाही सक्रिय सहभाग आवश्यक असतो, पण लज्जेमुळे पुढाकार घेणे तुम्हाला शक्य होत नसल्यास जोडीदाराला हे स्पष्टपणे सांगा. इथे तुम्ही लाजणार नाही, अशी अपेक्षा आहे. तुमच्या वर्तनात मला तरी काही चुकीचे वाटत नाही. मात्र, शरीरसंबंधांचा आनंद दोघांनाही लुटता यावा, यासाठी दोघांनीही क्रियाशील राहणे आवश्यक असते. जुना काळ आता मागे पडला आहे. त्यामुळे हळूहळू तुम्ही मनाची तयारी करत याबाबतीत पुढाकार घेण्याचा सराव करायला हवा. थोडा वेळ गेला तरी हरकत नाही, पण निरामय कामजीवनासाठी तुम्हालाही पुढाकार घेणे जमायला हवे.
मी २१ वर्षीय तरुण आहे. चाॅकलेट फ्लेवरचा निरोध वापरला की माझ्या लिंगाला खाज सुटते. इतर फ्लेवरचे निरोध वापरताना हा त्रास होत नाही. असे का होत असावे?
- चाॅकलेट फ्लेवरचे निरोध तयार करताना वापरण्यात येणाऱ्या घटकांपैकी एखाद्याची तुम्हाला ॲलर्जी असेल. त्यामुळे तुम्हाला हा त्रास होत असावा. नेहमीच असा त्रास होत असेल तर चाॅकलेट फ्लेवरचा निरोध वापरू नका. त्याऐवजी दुसरा निरोध वापरा. पण शारीरिक संबंध प्रस्थापित करताना कायम लैंगिक सुरक्षेला प्राधान्य द्या.
पती आणि माझ्यात नेहमी भांडणे होतात. आम्ही आठवड्यातून एकदाच शरीरसंबंध ठेवतो. माझ्या बहिणीने सांगितले की, जे जोडपे जास्त प्रमाणात शरीरसंबंध ठेवतात, त्यांच्यात कमी प्रमाणात भांडणे होतात. हे खरे आहे काय?
- जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, तेथे असा कुठलाही नियम लागू होत नाही. शरीरसंबंध ही आनंद देणारी क्रिया आहे. त्यामुळे जास्त प्रमाणात ही क्रिया करणारे साहजिकच जास्त आनंदी असतात आणि त्यामुळे त्यांच्यात भांडणे कमी होत असतील. हे साहजिक असले तरी असा ठोस नियम नाही. शरीरसंबंधाची इच्छा अनेक गोष्टींवर अवलंबून असते. मुळात नवरा-बायकोमधील नाते हे चांगले असायला हवे. शरीरसंबंध त्यात महत्त्वाचा भाग असला तरी चांगल्या नात्यासाठी तो एकमेव महत्त्वाचा घटक नाही. त्यामुळे, तुमचे नाते अधिक दृढ कसे होईल, याकडे तुम्ही लक्ष द्यायला हवे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.