सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ

डॉ रोहन जहागीरदार (मानसोपचार तज्ज्ञ आणि तज्ज्ञ)

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 18 Jun 2023
  • 02:51 am

सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ

मी ३२ वर्षांचा आहे. माझ्या लग्नाला आता ५ वर्षे झाली. मात्र, अलीकडच्या काळात माझी पत्नी सतत तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत फिरायला जाते. अनेकदा ते रात्री जेवायलादेखील जातात. पत्नी माझ्यापासून लांब जाते आहे का? ती आता घटस्फोट घेण्याच्या तयारीत आहे का?  अशा अनेक शंका माझ्या मनात येतात. त्यामुळे कधीकधी भीतीही वाटते. मी काय करू?

- पत्नी तिच्या मित्र-मैत्रिणींना भेटते, यात काळजी करण्यासारखं खरचं काही नाही. तुमच्यात जर उत्तम संवाद असेल, तर तुम्ही मोकळेपणाने पत्नीशी या विषयावर बोला. तिचे बाहेर जाण्याचे प्रमाण जास्त असेल, तर तिला तुम्हाला आणि घरातील इतरांना वेळ द्यायला सांगा. तुम्ही समजता तेवढी गंभीर समस्या यात काहीच नाही. तुमच्या बोलण्याने प्रश्न सुटेल. अगदीच गरज वाटली, तर विवाह समुपदेशकाशी चर्चा करा. त्याचा सल्ला घ्या.

 

मी ४५ वर्षांचा आहे. मी तरुण असताना माझं कामजीवन खूप बहारदार होते. आता त्या तुलनेत अनेक गोष्टींमध्ये कमतरता जाणवते. माझ्या पत्नीचे मी समाधान करू शकेन की नाही, याबाबतही अविश्वास वाटतो. यावर काही उपाय आहे का?

- केवळ शरीरसंबंधांबाबतच नाही, तर अनेक गोष्टी तरुणपणात खूप छान प्रकारे होतात. वयपरत्वे अनेक गोष्टी बदलतात. शारीरिक आणि मानसिक स्थितीतही बदल होतो. हा बदल स्वीकारून स्वतःला अधिक 'फिट' ठेवण्यासाठी प्रयत्न करा. व्यायाम, आहारातील बदल यामुळे या गोष्टी साध्य होऊ शकतील. निराश होऊ नका. पत्नीशीदेखील मोकळेपणाने संवाद साधा. तिला विश्वासात घ्या. गरज पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करा.

 

मी २० वर्षांची तरुणी आहे. मला योनीच्या भागात खूप खाज सुटते आणि खाजवल्यावर तेथील त्वचा लाल होते. असे का होत असावं? याचा परिणाम दीर्घकालीन राहील का?

- योनी भागात किंवा जांघांमध्ये खाज सुटणं हा त्रास अनेक महिलांना होतो. त्यात वेगळं असं काही नाही. जंतुसंसर्गामुळे अशा गोष्टी होतात. तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्या. अगदीच गरज वाटल्यास त्वचारोगतज्ज्ञांचाही सल्ला घ्या.

 

मी २५ वर्षांचा आहे. नुकत्याच झालेल्या शरीरसंबंधांच्या वेळी माझ्या निरोधचा रंग बदलला. असे दर वेळी होत नाही. यामागे काय कारण असू शकेल?

- काही कंपन्या त्यांनी तयार केलेल्या निरोधमध्ये अँटिबॉडीज टाकतात. त्यामुळे निरोध एसटीडीसंबंधित (सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसिज) विषाणूच्या संपर्कात आल्यास ते रंग बदलतं. ही धोक्याची पूर्वसूचना असते. तुम्ही तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा आणि त्यांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्या.

लैंगिक समस्यांबाबत आपल्या प्रश्नांसाठी - sexpert@punemirror.com

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story