Sexpert and Psychiatrist

डॉ रोहन जहागीरदार (मानसोपचार तज्ज्ञ आणि तज्ज्ञ)

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 15 Jun 2023
  • 01:11 am

सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ

माझे एका मुलावर प्रेम आहे. त्यालाही मी आवडते. आमच्यात पहिल्यांदाच शरीरसंबंध प्रस्थापित झाले. मात्र, त्यानंतर आता २ दिवस उलटून गेले, तरी त्याचा मला एकही फोन आलेला नाही. असे का झाले असेल? माझ्या मनात खूप चित्र-विचित्र विचार येत आहेत. मी काय करू?

- दोन दिवस हा तसा खूप मोठा कालावधी नाही. त्यामुळे तुम्ही कोणताही निष्कर्ष काढण्याची घाई करू नका. तुम्ही म्हणता त्या प्रमाणे तुमच्यात असं काही पहिल्यांदाच झालं असेल, तर तुमचा प्रियकरही ही गोष्ट शांतपणे घेत असेल. पुरुषाला अशा गोष्टी पचवायला वेळ लागत नाही, असं आपल्याला वाटतं. मात्र, असं नसतं. त्यामुळे कदाचित तोही विचार करत असेल. तुम्ही अजून थोडा काळ वाट बघा आणि त्यानंतर मात्र स्पष्टपणे विचारा. बोलल्याने तिढा सुटेल.

मी २२ वर्षांचा आहे. लिंगाची लांबी वाढावी यासाठी मी दोन महिन्यांपासून गोळ्या घेत आहेत. मात्र, त्यामुळे केवळ एक सेमी लांबी वाढल्याचं माझ्या लक्षात आले. मी त्या गोळ्या घेणे सुरू ठेवू का?

- कृपया अशा प्रकारची कोणतीही औषधे स्वतःच्या मनाप्रमाणे घेऊ नका. ताबडतोब त्या गोळ्या घेणे थांबवा. त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकता. लिंगाची लांबी ही गोष्ट तितकीशी महत्त्वाची नसते. तुम्हाला जर अन्य एखादी लैंगिक समस्या भेडसावत असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्या.

मी ४२ वर्षांची महिला आहे. मला संततीनियमनाच्या गोळ्या घ्यायची अजिबात इच्छा नाही. गर्भधारणा रोखण्यासाठी आणखी कोणते पर्याय उपलब्ध आहेत?

- संततीनियमनासाठी खूप महिला गोळ्या घेतात. अनेकांना तो सुरक्षित पर्याय वाटतो. मात्र, त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होत असतो. त्यामुळे वयाच्या कोणत्या टप्प्यापर्यंत त्या गोळ्या घ्याव्यात, याला मर्यादा आहे. शस्त्रक्रिया करून घेणं, हाही एक पर्याय आहे. त्याच बरोबर शरीरसंबंधांवेळी निरोध वापरणं हादेखील अत्यंत सोपा पर्याय आहे. याशिवाय तुम्ही डॉक्टरांशी चर्चा करून आणखी काही पर्यायांचा विचार करू शकता.

मी एक तरुणी असून, मी आणि माझा जोडीदार एकमेकांपासून  लांब राहतो. त्यामुळे आम्ही अनेकदा 'व्हर्च्युअली' (आभासी) सेक्सबाबत बोलतो. मात्र, असे करतानादेखील तो निरोध वापरतो. तो असे का करत असेल? मला काळजी वाटत आहे.

- तो असे का करत असेल, याचे उत्तर देणे कठीण आहे. सामान्यतः लोक असे करतात की, नाही यावरही बोलता येणे अवघड आहे. मात्र, तुम्हाला त्याच्या वागण्यात आणखी काही विचित्र गोष्टी आढळल्या, तर तुम्ही त्याच्याशी स्पष्ट बोला आणि चर्चेने प्रश्न सोडवा. कदाचित तो जे करतो आहे, ते करण्याची आवश्यकता आभासी पद्धतीमध्ये नसते, याची जाणीव त्याला कोणी तरी करून देण्याची गरज असेल.

लैंगिक समस्यांबाबत आपल्या प्रश्नांसाठी - sexpert@punemirror.com

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story