सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ
मी २८ वर्षांची मुलगी आहे. नुकतंच माझं लग्न झालं. आमच्या ओळखीतल्या एका काकूंनी मला सांगितलं की, असुरक्षित सेक्स केल्यानंतर पपई खाल्ल्यास गर्भ राहण्याचा धोका राहात नाही. त्यामुळे भरपूर पपई खावी. यात काही तथ्थ आहे का?
- आरोग्यासाठी पपई खाणं खूप फायदेशीर आहे. त्या फळात पोषणद्रव्येदेखील खूप आहेत. पपई खाण्याचे इतर अनेक फायदे आहेत. मात्र, पपई खाल्ल्याने गर्भधारणा होत नाही किंवा असुरक्षित सेक्स झाल्यावर लगेच पपई खाल्ल्याने त्याचा फायदा होतो, असं ठामपणे म्हणता येणार नाही. एखाद्या व्यक्तीला त्याचा फायदा झाला असेल. मात्र, सरसकट तसे म्हणता येत नाही. त्यामुळे कोणाच्याही म्हणण्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.
माझी पत्नी माझ्याशी खूप मोकळेपणाने बोलते. ती सतत तिला काय हवे, हे सांगत असते. सेक्सबद्दलही ती अनेक गोष्टी सांगते. तिच्या आवडी-निवडीवर बोलते. आमची खोली कशी सजवायची यावर बोलते. मात्र, हे सगळे सांगत असताना, ती फक्त स्वतःचा विचार करते किंवा मला आदेश देते, असे मला वाटते. मी काय करू?
- काही लोकांना सर्व गोष्टी खूप नियोजनबद्ध करायच्या असतात. प्रत्येक गोष्ट ते ठरवून आणि वेळ घेऊन करतात. त्यासाठी नियोजन करतात. तुमची पत्नी बहुतेक अशा लोकांपैकी एक आहे. त्यामुळे ती जर सगळं व्यवस्थित करत असेल, तर तुम्ही तिला सहकार्य करा. मात्र, ती तुम्हाला आदेश देते, असं तुम्हाला वाटत असेल, तर तिच्याशी मोकळेपणाने चर्चा करा. संवाद साधा.
माझ्या बहिणीने मला असे सांगितले की, 'आयव्हीएफ'द्वारे ज्या बाळांचा जन्म होतो, ते खूप हुशार असतात आणि दिसायलाही छान असतात. त्यामुळे मीदेखील 'आयव्हीएफ'चा विचार करत आहे. तिने सांगितले ते खरे आहे का?
- तुमच्या बहिणीचं म्हणणं जर खरं असलं असतं, तर सगळ्याच स्त्रियांनी 'आयव्हीएफ'च्या पर्यायाचा विचार केला असता. कोणीही खूप त्रास सहन करून नैसर्गिकपणे बाळ जन्माला घातलं नसतं. 'आयव्हीएफ' हा एक पर्याय आहे. अनेक दाम्पत्यांना मुलांना जन्म द्यायचा असतो. मात्र, काही अडचणींमुळे ते त्यांच्यासाठी शक्य नसतं. अशा लोकांसाठी ती एक सुविधा आहे. त्यामुळे तुम्ही कोणाचंही ऐकून काहीही विचार करू नका. केवळ ऐकीव माहितीच्या आधारे कोणताही निर्णय घेऊ नका.
लैंगिक समस्यांबाबत आपल्या प्रश्नांसाठी - sexpert@punemirror.com
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.