सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ
माझ्या मैत्रिणीचं वय आता २६ वर्षे आहे आणि तिच्या होणाऱ्या पतीचे वय ३७ वर्षे आहे. त्यांच्या कामजीवनात काही अडचणी येतील का? त्यांनी कोणती काळजी घ्यायला हवी ?
- वयामधील अंतरामुळे काही अडचणी निर्माण होऊ शकतात. कारण, वय सारखे नसेल, तर दोघांची कामेच्छा वेगवेगळी असू शकते. शारीरिक सामर्थ्यही वेगवेगळं असू शकतं. सेक्सबाबतचे विचार आणि ओढ यातही फरक पडू शकतो. त्यामुळे फरक तर असेलच. मात्र, दोघांनी एकमेकांना समजून घेतलं आणि एकमेकांच्या आवडीनिवडी जपल्या, तर कामजीवनातही फार अडचण येणार नाही.
मी आता ५० वर्षांची आहे. माझ्या एका मैत्रिणीने मला सांगितले की, पन्नाशीनंतरही कामेच्छा आणि उत्साह टिकवून ठेवण्यासाठी तिने अधिक प्रमाणात सेक्स करणे सुरू केले. यात काही तथ्य असू शकते का?
- नियमित सेक्स करण्याने तोटा काहीच नाही. त्यामुळे उत्साह वाटतो. मन व शरीर प्रसन्न राहतं, हे खरं. मात्र, पन्नाशीनंतर अधिक प्रमाणात असं काही केल्याने वयाचा भाग जाणवणार नाही, असं होत नाही. वय वाढत राहणार आणि वयानुसार त्या त्या गोष्टी जाणवणारच. ते आपण स्वीकारायला हवं. त्याचा त्रास करून न घेता आनंदाने तुमचं कामविश्व अनुभवा.
मी ३० वर्षांचा पुरुष आहे. माझ्या डोक्यात कधीकधी दिवसभर केवळ कामविषयक विचार असतात. मी माझी दैनंदिन कामे करत असतो. मात्र, हे विचार मनातून जात नाहत. त्यासाठी मी काय करू?
- क्वचित कधी तरी अशी अवस्था येत असेल, तर फार काळजी करू नका. प्रयत्नपूर्वक ते विचार टाळा आणि मन दुसऱ्या गोष्टींकडे वळवा. मात्र, सातत्याने असं होत असेल, तर समुपदेशकाशी संवाद साधा. त्याला तुमच्या समस्या सांगा आणि वेळीच उपचार करा. तुमचं मन दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतवा. चांगलं वाचन करा. जास्तीत जास्त लोकांमध्ये मिसळा. त्यामुळे तुमचे विचार बदलतील.
मी २५ वर्षांची तरुणी आहे. मासिक पाळीच्या दरम्यान मला खूप त्रास होतो. प्रचंड मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होतो. याचा परिणाम माझ्या कामजीवनावर होईल का?
- हो. अतिरक्तस्रावाने अशक्तपणा येतो. याचा परिणाम तुमच्या कामेच्छेवरही होऊ शकतो. त्यामुळे तुमची क्षमता, उत्साहदेखील कमी होऊ शकतो. तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषधोपचार घ्या.
लैंगिक समस्यांबाबत आपल्या प्रश्नांसाठी - sexpert@punemirror.com
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.