सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ
मला वीर्यपतन होताना जळजळ होते. असा अनुभव गेल्या काही दिवसांपासूनच येतो आहे. यापूर्वी असं होत नव्हतं. असे का होत असावे?
- जंतूसंसर्ग झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. लघवीच्या वेळीही असाच त्रास होत असल्यास तत्काळ डॉक्टरांकडे जा. हलगर्जीपणा करू नका. वेळीच औषधोपचार घ्या.
मला रोज दिवसातून दोन ते तीन वेळा हस्तमैथून करण्याची भावना होते. मात्र, तसे केल्यास शरीरावर त्याचे काही विपरित परिणाम होतील का, असा प्रश्न भेडसावतो. हस्तमैथून किती वेळा करावे, याबद्दल काही सांगाल का?
- हस्तमैथून किती वेळा करावं याचं कोणतंही गणित नाही. मात्र, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. त्या प्रमाणेतच अतिहस्तमैथून करू नये, हेही खरंच आहे. त्याचे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. त्याच प्रमाणे अशी सवय लागणे मानसिकदृष्ट्यादेखील घातक आहे. त्यामुळे तुम्ही प्रमाणातच सर्व गोष्टी करा.
मी ३५ वर्षांचा आहे. माझं लग्न एका ३० वर्षांच्या मुलीशी ठरलं आहे. मी याच्याआधी कधीही सेक्स केलेला नाही. मला तशी भावनाही होत नाही. मी समलिंगी असेल का? मी माझे लग्न थांबवू का?
- तुमच्या भावना तुम्हीच ओळखू शकता. तुम्हाला नक्की कोणाबद्दल आकर्षण वाटतं, याचा विचार करा. अनेक जणांना हे निश्चितपणे कळत नाही. त्यामुळे शांतपणे विचार करा आणि काही अधिक समस्या वाटल्यास वैद्यकीय सल्ला घ्या.
शरीरसंबंधांमध्ये स्त्रीचे समाधान नाही झाले, तर काय होतं?
- या प्रश्नाचं उत्तर द्यायला एखादा लेखच लिहावा लागेल. मात्र, थोडक्यात सांगायचं तर, अस झाल्याने त्या स्त्रीच्या वागण्यात, बोलण्यात खूप बदल होतात. ती मानसिकदृष्ट्या स्थिर राहत नाही. चिडचिडी होते. भावनिक संतुलन जातं आणि याचा परिणाम म्हणजे भांडण होतं. टोकाचे वाद होतात. अशा वेळी तिच्या जोडीदाराने तिच्याशी शांतपणे चर्चा करून असं होण्याची कारणे जाणून घ्यावीत आणि त्यानुसार बदल करावेत.
लैंगिक समस्यांबाबत आपल्या प्रश्नांसाठी -sexpert@punemirror.com
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.