सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ
1) शारीरिक संबंधांना ‘एक्सपायरी डेट’ असते का? की आयुष्याच्या अखेरपर्यंत आपण ही क्रिया करू शकतो?
- प्रश्न विचारताना तुम्ही वयाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे हा प्रश्न तुमच्या मनात का निर्माण झाला, याचा नेमका अंदाज लावता येणे अला अशक्य आहे. असो. आपल्या इतर अवयवांना ज्याप्रमाणे वयाचा निकष लागू होतो, अगदी तसाच प्रभाव आपल्या शारीरिक संबंधांवरदेखील पडतो. विशेषत: वय वाढले की कामेच्छा कमी होते. शारीरिक हालचाली कमी होतात. असे असले तरी, यासंबंधांत विशिष्ट अशी ‘एक्सपायरी डेट’ नसते. या गोष्टी टप्प्याटप्प्याने घडत असतात. यामुळे, तुमच्या मनात पुरेशी कामेच्छा निर्माण होत असल्यास तुम्ही आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत शरीरसंबंध प्रस्थापित करू शकता.
2) मी २० वर्षीय तरुणी आहे. इथे प्रत्येकाला परफेक्ट पार्टनर लाभला आहे. मला मात्र तो अद्यापही भेटलेला नाही. तो मला नक्की कुठे मिळेल?
- तुम्ही ज्या पद्धतीने हा प्रश्न विचारला, ते पाहून ‘परफेक्ट पार्टनर ही जणू बाजारात मिळणारी वस्तू असून आता मार्केटमध्ये सर्वत्र आऊट ऑफ स्टाॅक आहे,’ असे मला वाटले. ज्या व्यक्तीसोबत तुम्ही अत्युच्च पातळीवर जोडले जाता, त्याला परफेक्ट पार्टनर म्हणता येईल. तुम्हालाही अशी व्यक्ती नक्कीच मिळेल. त्यासाठी तुम्ही मोकळ्या मनाने शोध घ्यायला हवा. परफेक्ट पार्टनर ही विंडो शाॅपिंगमध्ये मिळणारी वस्तू नाही, हे कृपया लक्षात घ्यावे.
3) मी २९ वर्षीय महिला आहे. काही दिवसांपूर्वी नवऱ्याने मला सेक्स टाॅय आणून दिले. सुरुवातीला मला ते आवडले नाही. आता मात्र वास्तवात शरीरसंबंध प्रस्थापित केल्यापेक्षा सेक्स टाॅयचा वापर मला अधिक आनंददायी वाटत आहे. दुसरीकडे, नवरा दूर जाईल, याचीही भीती वाटते. मी काय करू?
- मला वाटते, सेक्स टाॅयच्या वापराने कामतृप्तीतील परमोच्च आनंद मिळत असल्याने तुम्हाला ते जास्त आवडत असावे. मात्र, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक घातक असतो. ही भेट नवऱ्यानेच दिली असल्याने त्याच्याशी चर्चा करून शरीरसंबंधादरम्यान तुम्ही सेक्स टाॅयचा वापर करू शकता. यामुळे दोघांचेही समाधान होईल.
4) मी ३४ वर्षीय पुरुष आहे. काही महिन्यांपूर्वी माझे गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाले. त्यानंतर तिला शरीरसुख हवे असेल तेव्हा ती माझ्याशी संपर्क साधते. तिला हवे ते मिळाले की नंतर पुन्हा शरीरसंबंधाची इच्छा होइपर्यंत ती संपर्क साधत नाही. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने असे घडत आहे. तिने ब्रेकअप केले असले तरी माझे तिच्यावर खूप प्रेम आहे. मी काय करू?
- गर्लफ्रेंडने ब्रेकअप केल्यानंतरही तुम्ही तिच्यात गुंतून आहात. याचा फायदा उचलून ती तिला हवे तेव्हा तुमचा फक्त शरीरसुखासाठी वापर करीत आहे. इतके दिवस तुम्ही हे सहन कसे केले, याचे मला नवल वाटते. शेवटी हा तुमच्या आत्मसन्मानाचा प्रश्न आहे. तुमचे तिच्यावर प्रेम असले तरी तिला तुम्ही केवळ शरीरसुखापुरते हवे आहात. ती पुन्हा आपल्यावर प्रेम करेल, या भ्रमातून लवकर बाहेर या. तिच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क ठेवू नका. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. नवे मित्र मिळवा. जे झालं ते विसरून नव्याने आयुष्य जगायला सुरुवात करा.
लैंगिक समस्यांबाबत आपल्या प्रश्नांसाठी- - sexpert@punemirror.com