सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ
1) मी १९ वर्षांचा मुलगा आहे. 'सेक्सी' कसे दिसावे याबाबत मला काही मार्गदर्शन कराल का?
- तरुण मित्रा, सेक्सी कसे राहावे, याची निश्चित व्याख्या नाही. मात्र, काही संकेत आहेत. त्यानुसार मी असे सांगेन की, स्वतःचे व्यक्तिमत्त्व विकसित कर. छान राहा, नियमित व्यायाम करा, वाचन करा, स्मार्ट पद्धतीने आयुष्य जगा. सर्वांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. असे केले तर, आपोआपच तुम्ही सर्वांना छान वाटाल. तुम्हाला चांगले मित्र-मैत्रिणीही मिळतील. सेक्सी राहणे म्हणजे केवळ शरीर चांगले ठेवणे असे होत नाही.
2) मी २६ वर्षांची तरुणी आहे. नवरा मला नेहमी असे सांगतो की, तो खूप बिझी आहे. त्यामुळे तो 'फोरप्ले' न करता थेट संभोग करतो. मला याचा त्रास होतो. मला हे अजिबात आवडत नाही. मात्र, त्याला हे कसे समजावून सांगू, हे कळत नाही. कृपया मार्गदर्शन करा.
- तुम्ही नवऱ्याशी या गोष्टी स्पष्ट बोलण्याची गरज आहे. कोणताही आडपडदा ठेवू नका. तुम्हाला जे वाटतं, ते खूप स्पष्ट आणि ठामपणे बोला. त्याला समजावून सांगा की, सेक्स ही गोष्ट केवळ करून टाकण्यासाठी नाही, तर ती क्रिया खूप आनंददायी आहे. त्यामुळे ती उत्साहाने आणि आनंदाने होणंच अपेक्षित आहे. तसं केलं, तर त्यालाही या गोष्टीचा आनंद मिळू शकतो.
3) मी १९ वर्षांची आहे. माझा पहिला प्रणयप्रसंग कसा असेल, सर्व नीट होईल ना, असा विचार मनात येऊन मला नैराश्य येतं. मी काय करू?
- 'परफेक्ट सेक्स' अशी कोणतीही संकल्पना अस्तित्त्वात नाही आणि तशी कोणतीच व्याख्याही नाही. प्रणयाला कोणतेही नियम नसतात. तुम्ही तुमच्या जोडीदाराशी बोलून तुम्हाला न आवडलेल्या गोष्टी बदलू शकतात. ती एक प्रक्रिया आहे. त्यामुळे त्यात बदल होत राहतात. तुम्ही असा कोणताही विचार आतापासून करू नका आणि निराश होऊ नका.
4) मी ३२ वर्षांचा आहे. माझ्या लग्नाला आता ५ वर्षे झाली. मात्र, अलीकडच्या काळात माझी पत्नी सतत तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत फिरायला जाते. अनेकदा ते रात्री जेवायलादेखील जातात. पत्नी माझ्यापासून लांब जाते आहे का? ती आता घटस्फोट घेण्याच्या तयारीत आहे का? अशा अनेक शंका माझ्या मनात येतात. त्यामुळे कधीकधी भीतीही वाटते. मी काय करू?
- पत्नी तिच्या मित्र-मैत्रिणींना भेटते, यात काळजी करण्यासारखं खरचं काही नाही. तुमच्याच जर उत्तम संवाद असेल, तर तुम्ही मोकळेपणाने पत्नीशी या विषयावर बोला. तिचे बाहेर जाण्याचे प्रमाण जास्त असेल, तर तिला तुम्हाला आणि घरातील इतरांना वेळ द्यायला सांगा. तुम्ही समजता तेवढी गंभीर समस्या यात काहीच नाही. तुमच्या बोलण्याने प्रश्न सुटेल. अगदीच गरज वाटली, तर विवाह समुपदेशकाशी चर्चा करा. त्याचा सल्ला घ्या.
लैंगिक समस्यांबाबत आपल्या प्रश्नांसाठी- - sexpert@punemirror.com