सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ
मी ४५ वर्षांचा आहे. मी तरुण असताना माझं कामजीवन खूप बहारदार होतं. आता त्या तुलनेत अनेक गोष्टींमध्ये कमतरता जाणवते. माझ्या पत्नीचं मी समाधान करू शकेन की नाही, याबाबतही अविश्वास वाटतो. यावर काही उपाय आहे का?
- केवळ शरीरसंबंधांबाबतच नाही, तर अनेक गोष्टी तरुणपणात खूप छान प्रकारे होतात. वयपरत्वे अनेक गोष्टी बदलतात. शारीरिक आणि मानसिक स्थितीतही बदल होतो. हा बदल स्वीकारून स्वतःला अधिक 'फिट' ठेवण्यासाठी प्रयत्न करा. व्यायाम, आहारातील बदल यामुळे या गोष्टी साध्य होऊ शकतील. निराश होऊ नका. पत्नीशीदेखील मोकळेपणाने संवाद साधा. तिला विश्वासात घ्या. गरज पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करा.
1) मी २३ वर्षांचा आहे. मला असं वाटतं की, माझ्या लिंगाचा आकार खूप लहान आहे. तो वाढवण्यासाठी काही करता येईल का?
- लिंगाचा आकार मोठा असला की, कामजीवनात अधिक आनंद मिळतो, हा खूप मोठा गैरसमज आहे. कामजीवनाचा आनंद तुम्ही ज्या प्रकारे कोणतीही कृती करता, त्यावर अवलंबून असतो. आकारावर ते अवलंबून नसतं. त्यामुळे तुम्ही गैरसमजाला बळी पडून कोणतेही औषधोपचार स्वतःच्या मनाने करू नका. अगदीच काही वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
2) मी २९ वर्षांचा आहे. माझं वैवाहिक नातं आणि कामजीवन फारसं चांगलं नाही. मला कधीकधी या नात्याचा खूप कंटाळा येतो. याबाबत मी काय करू? मला मार्गदर्शन करा.
- सर्वप्रथम तुम्ही ही गोष्ट तुमच्या पार्टनरशी मोकळेपणाने बोला. तुमच्या अडचणी, समस्या आणि प्रश्न अगदी स्पष्टपणे मांडा. त्यातून काही मार्ग निघत नसल्यास समुपदेशकाशी चर्चा करा. ते तुम्हाला यातून बाहेर पडायला नक्कीच मदत करतील. एकमेकांसोबत अधिक वेळ घालवा, एकत्र फिरायला जा. कोणताही टोकाचा निर्णय घेण्याआधी दहा वेळा विचार करा.
3) मी २५ वर्षांची तरुणी आहे. आमचं कामजीवन व्यवस्थित आहे. कामशास्त्रातील विविध आसने आम्ही करतो. मात्र, मला याबद्दल आणखी जाणून घेण्याची इच्छा आहे. सर्वांत जास्त आनंद कोणत्या आसनात मिळतो?
- शरीरसंबंधांमध्ये आनंद आणि समाधान या गोष्टी कोणत्याही एका घटकावर अवलंबून नसतात. कामशास्त्रात अनेक आसनांची माहिती देण्यात आली आहे. त्यापैकी खूपच थोड्या आसनांचा वापर सामान्यतः केला जातो. शरीरासंबंधी असलेल्या अडचणींमुळे अनेकांना खूप मर्यादा येतात. त्यामुळे तुम्हाला कशात अधिक आनंद मिळतो हे तुम्हीच शोधायला हवं. कोणताही त्रास न होता सहजपणे सर्व गोष्टींचा आनंद घ्या.
लैंगिक समस्यांबाबत आपल्या प्रश्नांसाठी - sexpert@punemirror.com