सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ
1) मी ४८ वर्षांची स्त्री आहे. आम्ही सरोगसीने बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, होणारं बाळ माझ्यासारखं दिसेल की, 'सरोगेट'सारखे दिसेल याची चिंता आम्हाला आहे. आम्हाला मार्गदर्शन करा.
- ढोबळमानाने सांगायचे झाल्यास बाळ सरोगेटसारखे दिसण्याची शक्यता जास्त असते. मात्र, अगदी असंच होईल असं नाही. काही बाबतीत ही शक्यता बदलूही शकते. मात्र, तुम्ही या गोष्टीचा विचार करू नका आणि आता तुम्ही हा निर्णय घेतला आहे, तर समजा ते बाळ सरोगेटसारखं दिसलं, तरी निराश होऊ नका. तो एक आयुष्यातील टप्पा म्हणून सोडून द्या आणि पुढे चालत राहा.
2) शरीरसंबंध ठेवल्याने प्रतिकारशक्ती वाढते, असा सल्ला आम्हाला लॉकडाऊनच्या काळात एका व्यक्तीने दिला होता. त्यामुळे आम्ही तेव्हा नियमित शरीरसंबंध ठेवत होतो. मात्र, आता कामाच्या तणावामुळे नियमितपणे सर्व गोष्टी होत नाहीत. याचा परिणाम पुन्हा एकदा प्रतिकारशक्तीवर होईल का?
- नियमित शरीरसंबंध ठेवल्याने मन प्रसन्न राहतं आणि शरीरही अधिक सक्रिय होतं. त्यामुळे नियमित शरीरसंबंध असावेत. मात्र, त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते, असं काही नाही. त्यामुळे तुम्हाला मिळालेली माहिती पूर्णतः खरी नाही. सद्यःस्थितीत तुम्हाला जेवढा वेळ मिळेल, तेवढा एकमेकांना द्या आणि त्यातून कामजीवनाचा आनंद घ्या.
3) मी २६ वर्षांची तरुणी आहे. नवरा मला नेहमी असे सांगतो की, तो खूप बिझी आहे. त्यामुळे तो 'फोरप्ले' न करता थेट संभोग करतो. मला याचा त्रास होतो. मला हे अजिबात आवडत नाही. मात्र, त्याला हे कसं समजावून सांगू, हे कळत नाही. कृपया मार्गदर्शन करा.
- तुम्ही नवऱ्याशी या गोष्टी स्पष्ट बोलण्याची गरज आहे. कोणताही आडपडदा ठेवू नका. तुम्हाला जे वाटतं, ते खूप स्पष्ट आणि ठामपणे बोला. त्याला समजावून सांगा की, सेक्स ही गोष्ट केवळ करून टाकण्यासाठी नाही, तर ती क्रिया खूप आनंददायी आहे. त्यामुळे ती उत्साहाने आणि आनंदाने होणंच अपेक्षित आहे. तसं केलं, तर त्यालाही या गोष्टीचा आनंद मिळू शकतो.
4) मी २५ वर्षांची महिला आहे. माझे नुकतेच लग्न झाले. आमचे कामजीवनही व्यवस्थित आहे. मात्र, माझ्या पार्टनरच्या अंगावर खूप केस आहेत. त्याच्या नाकातले केसही लांब आहेत. त्यामुळे अनेकदा मला किळसवाणे वाटते. मात्र, हे मी त्याला कसे सांगू? कृपया मार्गदर्शन करा.
- ही गोष्ट तुम्ही स्वतःच तुमच्या पार्टनरला सांगायला हवी. मात्र, हे सांगताना त्याला वाईट वाटणार नाही, अशा पद्धतीने सांगा. त्यामुळे तुमचं काम होईल आणि वादही होणार नाही. तुम्ही एकमेकांना एकमेकांच्या कोणत्याही गोष्टी सांगू शकाल, असं तुमचं नातं असेल, तर काहीही अडचण येणार नाही. तो समजूतदार असेल, तर नक्कीच तुमचं म्हणणं ऐकेल.
लैंगिक समस्यांबाबत आपल्या प्रश्नांसाठी - sexpert@punemirror.com