सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ
1) मी २८ वर्षांची महिला आहे. गेल्या काही दिवसांपासून मला खूप निराश वाटत आहे. याचा परिणाम म्हणूनच की काय, मला शरीरसंबंधांमध्येही रस वाटत नाही. मी काय करू?
- तुम्हाला नैराश्य आलं आहे. नैराश्य आले असल्याच्या काही लक्षणांपैकी हे एक लक्षण आहे, की ज्यात तुम्हाला कोणत्याच गोष्टीत रस वाटत नाही. याचा परिणाम म्हणूनच की काय, तुम्हाला आता शरीरसंबंधांमध्येही रस वाटत नाही. तुम्ही लवकरात लवकर समुपदेशक किंवा मनोविकारतज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि त्यांना तुमची समस्या सांगा. नैराश्य अधिक वाढू देऊ नका.
2) मी १९ वर्षांची आहे. माझा पहिला प्रणयप्रसंग कसा असेल, सर्व नीट होईल ना, असा विचार मनात येऊन मला नैराश्य येते. मी काय करू?
- 'परफेक्ट सेक्स' अशी कोणतीही संकल्पना अस्तित्वात नाही आणि तशी कोणतीच व्याख्याही नाही. प्रणयाला कोणतेही नियम नसतात. तुम्ही तुमच्या जोडीदाराशी बोलून तुम्हाला न आवडलेल्या गोष्टी बदलू शकता. ती एक प्रक्रिया आहे. त्यामुळे त्यात बदल होत राहतात. तुम्ही असा कोणताही विचार आतापासून करू नका आणि निराश होऊ नका.
3) माझे नुकतेच लग्न झाले आहे. मात्र, आमच्यात अद्याप शरीरसंबंध आलेले नाहीत. आम्हाला दोघांनाही याबाबत थोडा संकोच वाटत आहे.
- तुम्ही एकमेकांना भरपूर वेळ द्या. विविध विषयांवर चर्चा करा. संवाद साधा. त्यामुळे तुमच्यातील अवघडलेपण दूर होईल आणि पुढील गोष्टी सोप्या होतील. प्रयत्न करूनही जर तुमच्यात त्या गोष्टी होतच नसतील, तर मात्र समुपदेशकाचा सल्ला घ्या. त्याला तुमची समस्या मोकळेपणाने सांगा.
4) मी एक तरुणी आहे. मला आणि माझ्या जोडीदाराला चावट गप्पा मारायला खूप आवडतात. आम्ही बराच वेळ अशा विषयांवर बोलू शकतो. त्यातून आम्हाला आनंद मिळतो. मात्र, प्रत्यक्ष सेक्स करताना आम्ही तेवढे उत्साही नसतो, असं का होत असावं?
- एकमेकांशी चावट गप्पा मारणं यात चुकीचं काही नाही. तो आनंदाचा, चेष्टेचा भाग आहे. त्यामुळे शरीरसंबंध अधिक दृढ होतात. एकमेकांमध्ये मोकळेपणा राहतो. मात्र, तुमच्यात कोणतीही क्रिया घडत नसेल किंवा तुम्हाला त्याबाबत निरिच्छा वाटत असेल, तर मात्र एखाद्या समुपदेशकाशी याबाबत चर्चा करा. त्याचा सल्ला घ्या.
लैंगिक समस्यांबाबत आपल्या प्रश्नांसाठी - sexpert@punemirror.com