सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ
1) मी आता ४० वर्षांचा आहे. मध्यंतरी मी शरीर अधिक बळकट करण्यासाठी काही प्रोटिन्स आणि वेगवेगळ्या गोळ्या, पावडर घेत होतो. मात्र, नंतर याचा परिणाम माझ्या लैंगिक जाणिवांवार होतो आहे की काय, असे मला वाटले. लिंगाला ताठरता येण्यास अडचणी येऊ लागल्याचे मला जाणवत आहे. हे कशामुळे झाले असेल?
- डॉक्टरांचा सल्ला न घेता अशा प्रकारच्या गोळ्या किंवा पावडरचे सेवन केल्याने अशी समस्या निर्माण होऊ शकते. अशा प्रकारच्या अॅन्टिबायोटिक्सचा परिणाम तुमच्या कामच्छेवर आणि कार्यक्षमतेवर होऊ शकतो. लिंगामध्ये ताठरता येण्यास अडचण होणं, हा त्याचाच भाग आहे. तुम्ही तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्ही घेत असलेले प्रोटीन्स, पावडर वगैरे घेणं बंद करा. काळजी करू नका. डॉक्टरांच्या औषधोपचाराने सर्व काही पूर्ववत होईल.
2) मी आता ३० वर्षांची आहे. मासिक पाळीच्या काळात माझ्या स्तनांचा आकार वाढतो आणि ते थोडे अधिक सुडौल वाटू लागतात. मात्र, त्या चार दिवसांनंतर त्यांच्यात पुन्हा शीथिलता येते. ते मला अजिबात आवडत नाही. ते सतत तसेच राहावेत, यासाठी काही करता येईल का?
- शरीरात होणाऱ्या अंतर्गत बदलांमुळे आणि हार्मोन्समुळे स्तनांचा आकार बदलतो. हा बदल मासिक पाळीच्या काळात विशेषत्वाने होतो. त्यामुळे तो बदल म्हणून घ्यायला हवा. स्तनांचा आकार मोठा करणं किंवा त्यांच्यातली शिथिलता जाऊन ते अधिक कठीण करणं, या गोष्टी शस्त्रक्रियेद्वारे, औषधांद्वारे करता येतात. मात्र, त्याचे काही दुष्परिणामही असू शकतात. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच योग्य ते करा. जे नैसर्गिकदृष्ट्या जसं आहे, ते तसंच राहू द्यावे, असा सल्ला मी तुम्हाला देईन.
3) मी ३० वर्षांचा आहे. याआधी माझे क्वचितच शरीरसंबंध प्रस्थापित झाले आहेत. तरीदेखील माझ्या लिंगाच्या त्वचेवर रेषा पडलेल्या दिसतात. असे का झाले असेल?
- अॅलर्जीमुळे असं होऊ शकतो. त्वचेचा काही आजार असल्यासही असं होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही याकडे दुर्लक्ष न करता. तत्काळ डॉक्टरांना दाखवा आणि त्यांच्या सल्ल्याने औषधोपचार घेऊ लागा. याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकते.
4) मला अॅसिडिटीचा खूप त्रास आहे. त्यामुळे अनेकदा शरीरसंबंधांच्या वेळी मला ढेकर येतात. मला अवघडल्यासारखे वाटते. याचा कामजीवनावर आणखी काही परिणाम होईल का?
- अॅसिडिटीचा त्रास अत्यंत घातक असतो. तो वाढत गेल्यास पुढे खूप धोकादायकही ठरू शकतो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करा. अॅसिडिटी आणि गॅसेस यांचा त्रास वाढल्यास अनेकांना पाठदुखीचा त्रासही सुरू होतो. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका. शरीरसंबंधांवेळी अॅसिडिटीचा त्रास झाल्यास ढेकर दाबू नका. त्याने आणखी त्रास वाढेल.
लैंगिक समस्यांबाबत आपल्या प्रश्नांसाठी - sexpert@punemirror.com