सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ
1) मी ३५ वर्षांची महिला आहे. पुरुषांचं हृदय जिंकण्याचा मार्ग त्यांच्या पोटातून जातो, असं म्हणतात. मात्र, मला असं वाटत नाही. पुरुषांचं हृदय जिंकण्याचा मार्ग 'सेक्स' आहे, असं मला वाटतं. माझ्या विचारात काही चूक आहे का?
- प्रत्येकाचे विचार वेगळे असतात आणि प्रत्येकाचा अनुभवदेखील वेगवेगळा असतो. पुरुषांचं हृदय जिंकण्याचा मार्ग त्यांच्या पोटातून जातो, ही एक म्हण आहे. याचा अर्थ घरातील स्त्रीने उत्तम स्वयंपाक केला, तर ती सगळ्यांचं मन जिंकू शकते, असा होतो. यात पुरुषही येतात. दुसरीकडे 'सेक्स' हीदेखील महत्त्वाची गोष्ट असते. कामजीवन व्यवस्थित असेल, तर बाकी गोष्टीही व्यवस्थित होतात. त्यामुळे कोणतीही एकच गोष्ट महत्त्वाची असते, असा विचार न करता, तुम्ही सर्व गोष्टींचा आनंद घ्या. यामुळे तुम्हालाही छान वाटेल. त्याचप्रमाणे पुरुष केवळ सेक्सचाच विचार करत असतात, हे डोक्यात आणू नका.
2) मी ३५ वर्षांची आहे. मी गेल्या काही महिन्यांपासून व्हायब्रेटर वापरते आहे. मला आता नवऱ्यासोबत होणाऱ्या कामक्रीडेतील सुखापेक्षाही व्हायब्रेटरच्या माध्यमातून अधिक समाधान मिळते, असे वाटू लागले आहे. मी काय करू?
- व्हायब्रेटर हे एक यंत्र असल्याने त्याचा परिणाम हा प्रत्यक्ष शरीरसंबंधांपेक्षा निश्चितच चांगला असतो. कारण ते केवळ तेवढी एकच क्रिया करतं. मात्र, कामक्रीडेतील वैविध्य आणि जिवंतपणा त्यातून मिळणे शक्यच नाही. त्यामुळे काही दिवसांनी तुम्ही त्याच त्या गोष्टीला कंटाळाल असेही होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही एका गोष्टीच्या आहारी जाऊ नका, इतकेच मी सांगेन.
3) मी ४० वर्षांची महिला आहे. मी असं ऐकलं आहे की, नियमित शरीरसंबंधांमुळे आपण अधिक तरुण होतो. हे खरं आहे का? यात काही तथ्य आहे का?
- शरीरसंबंधांमुळे मन अधिक प्रफुल्लित होतं. दैनंदिन कामांमुळे आलेला थकवा निघून जातो. शरीराला आलेली मरगळ निघून जाते. नातेसंबंध अधिक दृढ होतात आणि त्याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक जीवनावर होतो. एकूणच वातावरण उत्साही होतं. त्यामुळे तरुण झाल्यासारखं वाटतं, असं म्हणण्याची प्रथा आहे. तरुण होणं याचा अर्थ शरीरसंबंधांमुळे वय घटतं असा कोणीही घेऊ नये. मात्र, त्यामुळे ताण-तणाव निघून जातात.
4) वीर्य गिळलं तर, गर्भधारणा होऊ शकते का? आणि 'आयव्हीएफ'ची प्रक्रिया प्रयोगशाळेत न करता, घरी करणं शक्य आहे का?
- नाही. पोट आणि गर्भ यांना जोडणारा कोणताही दुवा नाही. त्यामुळे वीर्य गिळल्याने गर्भधारणा होऊ शकत नाही. गर्भधारणा होण्यासाठी पुरुषाचं वीर्य आणि स्त्रीची बीजांडे यांचं मिलन होणं आवश्यक असतं. त्यातून नवा जीव जन्माला येतो. त्यामुळे वीर्य पोटात गेल्यास फार काळजी करण्याची गरज नाही. 'आयव्हीएफ'मध्ये अनेक घटकांचा विचार महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे ती प्रक्रिया घरी होऊ शकत नाही.
लैंगिक समस्यांबाबत आपल्या प्रश्नांसाठी - sexpert@punemirror.com