सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ
मी २४ वर्षांची तरुणी आहे. माझा विवाह व्हायचा आहे. माझ्या पतीला कोणतेही व्यसन नसावं, अशीच माझी इच्छा आहे. मात्र, आजवर मी जेवढ्याही मुलांना भेटले त्यांना कोणते तरी व्यसन होते. त्यामुळे मला नैराश्य आले आहे. मी काय करू?
- निराश होऊ नका. व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढतं आहे. त्यामुळे असा अनुभव येऊ शकतो. मात्र, सरसकट असा निष्कर्ष काढू नका. जमल्यास भेट होण्यापूर्वीच काही गोष्टी स्पष्टपणे सांगा. त्यात मुलगा निर्व्यसनी हवा, असं स्पष्टपणे लिहा. यामुळे गोष्टी अजून सोप्या होतील. तुम्ही या गोष्टीचा त्रास करून घेऊ नका. सकारात्मक राहा.
मी २० वर्षांचा आहे. माझे एक टेस्टिकल (अंडकोष) दुसऱ्यापेक्षा थोडं मोठं आहे. मला तेथे वेदनादेखील होतात. मी काय करू?
- तुम्हाला जंतुसंसर्ग झाला असण्याची शक्यता आहे. तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना दाखवा. अन्यथा संसर्ग दुसरीकडे पसरू शकतो.
माझे नुकतेच लग्न झाले आहे. पहिल्या सेक्सच्या वेळी माझा पती सर्व गोष्टी खूप सराईतपणे करत होता. त्यामुळे मला संशय वाटत आहे. त्याने यापूर्वी सेक्सचा अनुभव घेतला असेल का, असे विचार माझ्या मनात येत आहेत. मी काय करू?
- सेक्सच्या वेळी एखाद्याने खूप नीटपणे सगळे केले, म्हणून लगेच त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा शिक्का मारणे योग्य नाही. आवेगात अशा गोष्टी पटापट होतात. काहींची मानसिक तयारी आधीपासून असते. त्यामुळे ऐन वेळी ते सर्व गोष्टी अतिशय व्यवस्थितपणे करतात. कोणतीही माहिती हाती लागल्याशिवाय किंवा तुम्हाला एखादा सबळ पुरावा मिळाल्याशिवाय तुम्ही नवऱ्यावर अशा प्रकारचा संशय घेऊ नका. यामुळे तुमचं आयुष्य खराब होईल.
मी २७ वर्षांची तरुणी आहे. मी अविवाहित आहे. मी पाहते की, सोशल मीडियावर लोक खूप खासगी गोष्टी शेअर करत असतात. अनेकदा तिथे 'कपल गोल' वगैरेसारखे 'ट्रेंड' असतात. काही जण सेक्सबद्दलही बोलतात. मला हे सगळे खूप विचित्र वाटते. लग्नानंतर माझ्याही बाबतीत असे होईल का?
- लग्नानंतर असे करायचे की, नाही हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. कोणत्याही 'ट्रेंड'मध्ये सहभागी होणं अथवा न होणं हे आपल्याला ठरवता येतं. सोशल मीडियावर आपली कोणतीही माहिती, छायाचित्र शेअर करताना भान ठेवावं. हल्ली 'ट्रेंड'च्या नावाखाली अनेक खासगी गोष्टीदेखील चव्हाट्यावर येतात, ते अत्यंत चुकीचं आहे.
लैंगिक समस्यांबाबत आपल्या प्रश्नांसाठी - sexpert@punemirror.com