सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ
1) मी ३४ वर्षांची महिला आहे. माझे वजन गेल्या काही दिवसांपूर्वी खूप वाढले होते. ते मी प्रयत्नपूर्वक २८ किलोने कमी केले. आता आम्ही अपत्याचा विचार करत आहोत. मात्र, बाळंतपणामुळे माझं वजन पुन्हा वाढेल आणि शरीर बेढभ होईल, या भीतीने मी सरोगसीद्वारे मुल जन्माला घालावे का, याचा विचार करत आहे. कृपया मार्गदर्शन करा.
- दाम्पत्यापैकी कोणाला तरी एकाला किंवा दोघांना आरोग्याच्या काही समस्या असतील आणि खूप प्रयत्न करत असूनही गर्भ राहत नसेल, तर अशा वेळी सरोगसीचा विचार केला जातो. मात्र, केवळ शरीराचा आकार बदलेल असा विचार करून तुम्ही सरोगसी हा पर्याय निवडणार असाल, तर ते मात्र चूक आहे. कारण सरोगसीचा पर्यायही वाटतो तितका सोपा नसतो. त्यातही शरीराला त्रास होतोच. त्यामुळे सर्व बाजूंनी विचार करून योग्य तो निर्णय घ्या.
2) सहा महिन्यांपूर्वी मी आई झाले. आमच्यात तेव्हापासून एकदाही सेक्स झालेला नाही. मात्र, मला त्याचे काहीच वाटत नाही. माझ्या बाळामुळे मी आनंदी आहे. अशी मनस्थिती सर्वांचीच असते का?
- बाळंतपणानंतर थोड्या फार प्रमाणात भावना बदलतात आणि सेक्सची इच्छा कमी होत जाते. मात्र, शरीरसंबंध अजिबात न ठेवणं हे योग्य नाही. याचा परिणाम तुमच्या मनावर आणि शरीरावरदेखील होऊ शकतो, तसेच तुमची आई म्हणून जशी काही कर्तव्ये आहेत, तशीच पत्नी म्हणूनही काही कर्तव्ये आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या पतीशी चर्चा करून यावर योग्य तो मार्ग काढा.
3) लग्नानंतर बाहेर कुठे तरी प्रेमप्रकरण केल्याने वैवाहिक जीवनात आलेला तोचतोचपणा दूर होण्यास मदत होते, असं मला कुणी तरी सांगितलं आहे. यात तथ्य आहे का?
- अजिबात नाही. लन्नानंतर नात्यांमध्ये निर्माण होणारा तोचतोचपणा दूर करण्यावर बाहेरख्यालीपणा हे उत्तर कधीच असू शकत नाही. यामुळे नातेसंबंध आणखीनच बिघडतील. कुटुंबातील अनेक जणांना याचा त्रास सहन करावा लागेल आणि एका क्षणी सर्व गोष्टी हातातून हरवल्या आहेत, अशी भावना होईल. त्यामुळे असा कोणताही विचार करू नका आणि अशा गोष्टींकडे लक्षही देऊ नका
4 ) मला सेक्स करायला खूप आवडते आणि मरेपर्यंत मी तो करावा, अशी माझी इच्छा आहे. असे करणे शक्य आहे का?
- शारीरिक सामर्थ्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. मनाने कितीही कल्पना केल्या किंवा तुम्ही मनाने तरुण राहिलात, तरी एका टप्प्यानंतर शरीर थकतं. त्याच्यापुढे सेक्स करणं किती जमेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे जोवर तुम्हाला शक्य आहे, तोवर सेक्सचा आनंद घ्या. बाकी खूप पुढचा विचार करू नका.
लैंगिक समस्यांबाबत आपल्या प्रश्नांसाठी - sexpert@punemirror.com