सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ
1) माझ्या मुलाच्या शाळेत लैंगिक शिक्षणाचे वर्ग घेतले जाणार आहेत. माझा मुलगा १४ वर्षांचा आहे. या वयात लैंगिक शिक्षण दिल्याने मुलाच्या मनावर त्याचे विपरीत परिणाम होतील का?
- तुमच्या मुलाच्या शाळेत लैंगिक शिक्षणाचे वर्ग घेतले जाणार आहेत, ही फार चांगली गोष्ट आहे. त्याचे वयही या ज्ञानासाठी अगदी योग्य आहे. साधारणपणे वयाच्या १३-१४ व्या वर्षी मुला-मुलींमध्ये लैंगिकतेचा उगम होतो. मुलींना (काही वेळा तर त्याही आधी) मासिक पाळी सुरू होते व मुलांमध्ये पुरुषत्वाची लक्षणे दिसू लागतात. याच सुमारास अगदी नैसर्गिकपणे मुला-मुलींना एकमेकांबद्दल आकर्षण वाटू लागते. त्यामुळे काळजी करू नका आणि गरज पडल्यास त्याच्याशी मोकळेपणाने संवाद साधा.
2) स्तन आकाराने लहान असल्यास ते मोठे करता येतील अशी औषधे, गोळ्या, मलम किंवा इंजेक्शन्स उपलब्ध आहेत का? स्तनांचा आकार शस्त्रक्रिया करून वाढवता येतो, असे मी वाचले आहे. ते करणे योग्य ठरते का?
- स्तन मोठे करता येतील अशी औषधे, गोळ्या, मलम किंवा इंजेक्शन्स उपलब्ध नाहीत. विशिष्ट आहार घेऊनही स्तन मोठे करता येत नाहीत. स्तनांच्या खाली असलेल्या पेक्टोरल स्नायूंचा विशिष्ट व्यायाम केल्यास स्तन मोठे दिसण्यास मदत होऊ शकते. अनेक स्त्रियामधे उगीचच ‘आपले स्तन लहान आहेत’ असा न्यूनगंड असतो. त्याचा त्यांच्या आयुष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे असे विचार न करणेच उत्तम. प्रत्येकाची शरीरयष्टी ही अनेक कारणांमुळे वेगवेगळी असू शकते यावर विश्वास ठेवा.
3) माझ्या जोडीदाराच्या स्वभावात सतत बदल होताना दिसतो. याचा परिणाम तिच्या लैंगिक जाणिवांवरही होतो, असे मला वाटते. त्यामुळे आमच्यात इथून पुढे कोणतेच नाते राहणार नाही का? असेही वाटते. याचा आमच्या शरीरसंबंधांवरही परिणाम होण्याची भीती वाटते.
- मुळात महिलांचा स्वभाव आणि त्यातही त्यांच्या लैंगिक जाणिवा, त्यांना शरीरसंबंधांबाबत वाटणाऱ्या गोष्टी, इच्छा सतत बदलत असतात. काही महिला खूप भावनिक असतात. त्यामुळे त्यांच्या मनोवस्थेवर बाकी सर्व गोष्टी अवलंबून असतात. मात्र, तुमच्या जोडीदाराच्या बाबतीत हे प्रमाण खूपच जास्त असेल, तर तुम्ही वेळीच योग्य ती काळजी घ्या. तिच्याशी मोकळेपणाने चर्चा करा आणि समस्येचं मूळ शोधून तिचे निराकरण करा.
4) मी ३९ वर्षांचा असून, माझे 'सेक्स लाइफ' म्हणावे तेवढे चांगले नाही. महिन्यातून दोन किंवा तीन वेळाच सेक्स होतो आणि तोही केवळ सुट्टीच्याच दिवशी. त्यामुळे उदासही वाटते. मी काय करू?
- सर्वांत आधी, तर तुम्ही स्वतःला वेळ द्या. स्वतःशी आणि तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने संवाद साधा. केवळ सुट्टीच्याच दिवशी स्वतःला वेळ देत असाल, तरी ती सवय बदला. निराश होऊ नका. सेक्स किती वेळा होतो, याहीपेक्षा तो कसा होतो, याकडे लक्ष द्या. नैराश्यात अडकून राहू नका.
लैंगिक समस्यांबाबत आपल्या प्रश्नांसाठी - sexpert@punemirror.com
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.