सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ
मी1) ४० वर्षीय महिला आहे. लग्नानंतर काही वर्षे शारीरिक आणि मानसिकृदृष्ट्या जी जवळीक माझ्यात आणि नवऱ्यात निर्माण झाली होती, त्याची पुनरावृत्ती शक्य आहे का?
- नातेसंबंधातील प्रेमाची किंवा शारीरिक संबंधाची ओढ आयुष्यभर एकसाखी राहणे शक्यच नाही. वय तसेच परिस्थितीनुरूप त्यात बदल हे होणारच. मात्र, तुमच्यापुरते बोलायचे झाल्यास, तुम्हाला जोडीदाराशी जवळीक साधण्यात रस वाटत नसल्यास त्याला अनेक कारणे असू शकतात. वाढलेले वय, मातृत्व, वैद्यकीय तसेच भावनिक समस्या यापैकी कोणत्याही कारणांमुळे तुमचा शारीरिक संबंधांमधील रस कमी होऊ शकतो. या प्रकरणात शक्य तेवढ्या लवकर तज्ज्ञांचा सल्ला घ्या, जेणेकरून तुमचे लैंगिक आयुष्य पुन्हा आनंददायी ठरेल.
2) मी ५० वर्षीय पुरुष आहे. ‘दिवसातून तीन कप काॅफीचे सेवन केल्याने लिंगामधील शिथिलता दूर होते,’ असे मी एका पुस्तकात वाचले होते. हे खरे आहे काय?
- तुम्ही जे काही वाचले, ते पूर्णत: चुकीचे आहे. अशा गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नाही. काॅफीच्या सेवनाने लिंगामधील शिथिलता, शीघ्रपतन या समस्या दूर झाल्या असत्या तर जगभरातील पुरुष दिवसभर काॅफी पीत बसले असते. तुम्हाला अशी काही समस्या असल्यास डाॅक्टरांशी संपर्क साधून योग्य तो उपचार घ्या. नको त्या गोष्टींच्या मागे लागू नका.
3) मी २६ वर्षीय तरुणी आहे. मला द्विअर्थी विनोद कळत नाहीत. यामुळे माझ्या बाॅयफ्रेण्डची मोठी पंचाईत होते. द्विअर्थी विनोद कळण्यासाठी मी काय करायला हवे? याचे कुठे क्लासेस असतात का?
- जगात प्रत्येक गोष्टीचे क्लासेस नसतात. काही गोष्टी आपण स्वत:हून शिकायच्या असतात. द्विअर्थी विनोद ही अशीच गोष्ट आहे. हे विनोद तुम्हाला का कळत नाही, हे समजून घ्यायला माझ्याकडे कोणताही मार्ग नाही. पण ही गोष्ट आपल्याला कळत नसल्याने बाॅयफ्रेण्डची होणारी पंचाईत तुम्हाला नको वाटते. याचा अर्थ तुम्ही तुमच्या रिलेशनशिपबद्दल गंभीर आहात. तुमचा मित्रदेखील याबाबत गंभीर असेल अशी अपेक्षा आहे. असे असताना तुम्ही त्यालाच ही अडचण सांगून जे काही बोलायचं असेल, ते थेट बोलायला सांगा. म्हणजे, त्याचे आधीचे द्विअर्थी बोलणे आणि त्याला नेमके काय अपेक्षित आहे, या गोष्टींची सांगड घातली की द्विअर्थी बोलणे तुम्हाला समजेल. एवढे करून नाहीच समजले तर त्यावाचून फारसे अडत नाही. यासाठी अजिबात वाईट वाटून घेऊ नका. थेट मुद्द्यावर येणे ही सर्वांत चांगली गोष्ट आहे.
4) मी २० वर्षीय तरुण आहे. एका औषधाच्या दुकानातून मी कामशक्तिवर्धक औषध घेतले. मात्र, त्याच्या सेवनामुळे कामोत्तेजना वाढणे तर दूरच, मला डोकेदुखी आणि डायरियाचा त्रास झाला. असे का झाले असावे?
- तुम्ही नेमके कोणते औषध घेतले, हे मला माहीत नाही. मात्र अशा औषधाचे सेवन करण्यासंदर्भात दोन गोष्टी कायम लक्षात ठेवा... एक म्हणजे, अशी औषधे नेहमी डाॅक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. दुसरी गोष्ट, अशा औषधाचे काय साईड इफेक्ट होऊ शकतात, याची माहिती आधीच डाॅक्टरांकडून घ्या. म्हणजे, अशी समस्या उद्भवल्यास तुमची फार अडचण होणार नाही.
लैंगिक समस्यांबाबत आपल्या प्रश्नांसाठी - sexpert@punemirror.com
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.